July 13, 2021
14
दुसरा सामना 8 धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी, सामनावीर दीप्तीची अष्टपैलू चमक
वृत्तसंस्था / व्होव
Advertisements
पूनम यादव व दीप्ती शर्मा यांनी केलेला भेदक फिरकी मारा व क्षेत्ररक्षकांनी केलेल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या बळावर भारतीय महिलांनी येथे झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडचा 8 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. नाबाद 24 धावा व 18 धावांत एक बळी आणि दोन धावचीतसाठी साहय़ केलेल्या दीप्ती शर्माला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.
भारताने शफाली वर्माची आक्रमक फटकेबाजी आणि कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना व दीप्ती शर्मा यांच्या समयोचित योगदानामुळे 20 षटकांत 4 बाद 148 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडला 20 षटकांत 8 बाद 140 धावांवर रोखत भारताने हा सामना 8 धावांनी जिंकला. इंग्लंड महिलांना शेवटच्या 30 चेंडूत 33 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे 6 गडी बाकी होते. पण भारतीय स्पिनर्सनी केलेल्या अचूक माऱयाच्या दडपणामुळे इंग्लंड संघ कोलमडला. शेवटच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज होती. पण ऑफस्पिनर स्नेह राणाने त्याचे संरक्षण करीत इतर स्पिनर्सनी केलेल्या कामगिरीवर कळस चढविला. लेगस्पिनर पूनम यादवने 17 धावांत 2 बळी मिळविले तर दीप्तीने 18 धावा देत एक बळी मिळविला. या गोलंदाजांना चपळ क्षेत्ररक्षणाचीही उत्तम साथ मिळाल्याने इंग्लंडच्या चार खेळाडू धावचीत झाल्या. बुधवारी या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना होणार आहे.
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली होती. वॅट व स्किव्हर लवकर बाद झाल्या असल्या तरी त्यांनी 6 षटकांत 2 बाद 52 धावा जमविल्या तेव्हा ते हा सामना सहज जिंकणार असेच वाटले होते. टॅमी ब्युमाँट (50 चेंडूत 59) व हीदर नाईट (28 चेंडूत 30) यांनी फटकेबाजी करीत संघाचे शतक 13 षटकात फलकावर लावले. वेगवान गोलंदाज शिखा पांडे व अरुंधती रेड्डी यांच्या स्वैर माऱयाचा त्यांनी लाभ घेतला. पण ब्युमाँट व नाईट दीप्ती शर्माच्या लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर मात्र त्यांचे फलंदाज ठरावीत अंतराने बाद होत गेले. 36 चेंडूत 43 धावांची गरज असताना भारतीयांनी अचूक मारा करीत त्यांच्यावर दडपण वाढवले आणि अखेर त्यांना 8 बाद 140 धावांवर रोखत विजय साकार केला.
शफालीची फटकेबाजी
त्याआधी भारतीय डावात शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी दणकेबाज सुरुवात करून देताना 4 षटकांत बिनबाद 47 धावा तडकावल्या. 17 वर्षीय शफालीने जोरदार फटकेबाजी करीत एक्लेस्टोनला चौकार व षटकार मारल्यानंतर कॅथरिन ब्रंटच्या एका षटकात सलग पाच चौकार ठोकून तिची लय बिघडवून टाकली. स्मृतीने मात्र शफालीला जादा स्ट्राईक देण्याचे धोरण ठेवले होते. तिने 16 चेंडूत 20 धावा फटकावल्या आणि शफालीसमवेत 8.5 षटकांत 70 धावांची सलामी दिली. शफालीने 38 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 48 धावा झोडपल्या. दोघी पाठोपाठ बाद झाल्यानंतर चांगल्या सुरुवातीचा नंतरच्या फलंदाजांना पुरेसा लाभ उठवता आला नाही. तिसऱया स्थानी आलेल्या हरमनप्रीतने फटकेबाजी करीत 25 चेंडूत 31 व दीप्ती शर्माने 27 चेंडूत नाबाद 24 धावा काढल्या. रिचा घोषने 8 व स्नेह राणाने नाबाद 8 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक ः भारत महिला 20 षटकांत 4 बाद 148 ः स्मृती मानधना 16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 20, शफाली वर्मा 38 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 48, हरमनप्रीत कौर 25 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 31, दीप्ती शर्मा 27 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 24, रिचा घोष 8, राणा नाबाद 8, अवांतर 9. गोलंदाजी ः स्किव्हर 1-20, पेया डेव्हिस 1-31, सारा ग्लेन 1-32, मॅडी व्हिलियर्स 1-9, ब्रंट 0-34.
इंग्लंड महिला 20 षटकांत 8 बाद 140 ः ब्युमाँट 50 चेंडूत 7 चौकारोसह 59, नाईट 28 चेंडूत 4 चौकारांसह 30, जोन्स 12 चेंडूत 1 षटकारासह 11, अवांतर 19. गोलंदाजी ः पूनम यादव 2-17, दीप्ती 1-18, अरुंधती रेड्डी 1-30, राणा 0-21.
Share