July 13, 2021
11
प्रथम अवकाश प्रवास ‘सुफळ संपूर्ण’ झाल्यानंतरच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
हय़ूस्टन / वृत्तसंस्था
Advertisements
रविवारी सात अंतराळ प्रवाशांसह अवकाशात झेपावलेले ‘व्हीव्हीएस युनिटी’ हे यान अडीच तासांच्या अवकाश प्रवासानंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहे. त्यामुळे या पहिल्याच खासगी अंतराळ प्रवासाठी ही रम्य कहाणी ‘सुफळ संपूर्ण’ झाली. हा अनुभव निखळपणे अद्भूत, अविस्मरणीय आणि अन्यन्यसाधारण होता, अशी प्रतिक्रिया या अभियानाचे संचालक उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी व्यक्त केली. तर या अविश्वसनीय प्रवासानंतर आपल्या जीवनाची दिशाच बदलून गेली आहे, असे उत्स्फूर्त आणि सार्थ उद्गार हा प्रवास केलेली भारतीय वंशाची आणि भारतात जन्मलेली तरुणी सिरीशा बांदला हिने पृथ्वीवर परतल्यावर काढले.
भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री आठ वाजून 10 मिनिटांनी या ऐतिहासिक प्रवासाचा प्रारंभ झाला होता. प्रथम काही काळ विमानाने प्रवास केल्यानंतर हे यान विमानापासून विलग झाले आणि नंतरचे अंतराळातील अंतर त्याने स्वबळावर कापले. यानाने पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणतः 96 ते 100 किलोमीटरची उंची गाठली आणि नंतर परतीचा प्रवास सुरू केला.
उपकक्षा प्रवास
हा प्रवास तांत्रिक भाषेत उपकक्षा प्रवास किंवा सबऑर्बिटल प्रवास म्हणून ओळखला जात आहे. याचा अर्थ असा की या यानाने पृथ्वीची कक्षा पूर्णतः ओलांडून अंतराळात प्रवेश केला नव्हता. तर त्यापेक्षा कमी उंची गाठली होती. त्यामुळे प्रवास संपवून पृथ्वीवर पुन्हा थोडक्या वेळेत परतणे शक्य झाले, अशी माहिती या अभियानाच्या तंत्रज्ञांनी नंतर पत्रकारांना दिली.
वेळेचे गणित अचूक
या प्रवासात यानाने अधिकतर वेग 28 हजार किलोमीटर प्रतितास इतका गाठला होता. परतताना सरळ पृथ्वीवर न पडता पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत हळूवारपणे ते पृष्ठभागावर स्थिरावले. त्यामुळे सर्व अंतराळ प्रवासी सुरक्षितपणे पोहचू शकले. यान पूर्वनिर्धारित विशिष्ट स्थानावर विशिष्ट वेळेत पोहचले.
हा अनुभव भावनोत्कट
सिरीशा बांदला यांनी आपला अनुभव अतिशय भावनोत्कट होता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्याला खरेतर अंतराळ वीर व्हायचे होते. नासाच्या वैज्ञानिक अंतराळ अभियानांमध्ये समाविष्ट व्हायचे होते. तथापि एका अनोख्या पद्धतीने आपला प्रथम अंतराळ प्रवास घडला, जो आपण कधीही विसरू शकणार नाही, असे उद्गार त्यांनी प्रवासानंतर बोलताना काढले.
जन्म गुंटूरचा
सिरीशा बांदला या 34 वर्षांच्या असून त्यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्हय़ातील आहे. मात्र त्यांचे बालपण अमेरिकेतील हय़ूस्टन येथे गेले. त्यांच्यासह या प्रवासाला गेलेल्या इतर अंतराळ प्रवाशांमध्ये दोन विमानचालक आणि तीन इतर व्यक्ती होत्या. स्वतः रिचर्ड ब्रॅन्सनही त्यांच्यासमवेत होतेच. अशा प्रकारे एकंदर सात प्रवाशांनी हा प्रथम अनुभव घेतला. हा केवळ श्रीमंतांसाठी असलेला मनोरंजनात्मक प्रवास असणार नाही. भविष्यात या अभियानाचे सामाजिक स्वरूप स्पष्ट होईल, असे प्रतिपादन बांदला यांनी आवर्जून केले.
Share