Taliye Village Flood Update 36 Missing Air Force Personnel With The Help Of NDRF
दरड दुर्घटना:तळियेत 36 बेपत्ता; सांगलीत घराघरांत घुसले पाणी, एनडीआरएफच्या मदतीला वायुसेनेचे जवान
रायगड12 तासांपूर्वी
कॉपी लिंक
गाळेल येथे ढिगाऱ्यात अडकलेल्या तरुणाचा शोध शनिवारी सुरू करण्यात आला.
महाडमधील तळिये येथे दरड कोसळल्याच्या घटनेत ८५ व्यक्ती अडकल्या असून त्यापैकी ४९ मृतदेह आढळले आहेत. यापैकी ३३ मृतदेहांची ओळख पटली आहे, तर अद्यापही ३६ व्यक्ती बेपत्ता आहेत. रायगड जिल्हा प्रशासनामार्फत ही माहिती देण्यात आली आहे. तळिये गावाची लोकसंख्या २४१ असून त्यापैकी १०९ व्यक्ती गावाबाहेर होत्या. ४१ व्यक्तींची सुटका करण्यात आली. ६ जण जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत १३ बैल व २० गायी अशी एकूण ३३ जनावरे दगावली आहेत. राष्ट्रीय आपत्ती बचाव पथक, स्थानिक बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने शोधकार्य अद्यापही सुरू आहे. बचाव कार्यादरम्यान आढळलेल्या ४९ पैकी ३३ मृतदेहांची ओळख पटली आहे. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे शनिवारी रात्री शोधकार्य थांबवण्यात आले होते.
कोल्हापुरात पावसाची उसंत; लष्कराचे जवानही दाखल
गेले तीन दिवस कोल्हापूरला झोडपून काढणाऱ्या पावसाने अखेर शुक्रवारी मध्यरात्री पासून उसंत घेतली. अतिवृष्टी थांबल्याने पूर ओसरू लागला आहे. तरीही अद्याप पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने महापुराची स्थिती गंभीर आहे. अनेक गावांना महापुराचा वेढा असल्याने नागरिक अडकून पडले आहेत. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या मदतीला वायुसेनेचे जवान दाखल झाले. चिखली, आंबेवाडीसह विविध गावांतील पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तुकड्या गुजरात, बडोद्यासह अन्य राज्यातून दाखल होत आहेत. एकूण सहा तुकड्या दाखल होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत तीन विमानांतून तीन तुकड्यांतील सुमारे ६० जवान दाखल झाले आहेत. रात्रीपर्यंत आणखी तीन विमानांतून ४० जवान दाखल होणार आहेत. एनडीआरएफ महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
पेट्रोलसाठी रांगा : महापुरामुळे पुणे-बंगळुरू हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील विविध राज्य महामार्ग व इतर रस्ते बंद झाले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पेट्रोल व डिझेल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढले. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या.
पावसाची उसंत, सांगलीवरील संकट टळले; तब्बल ५७ रस्ते गेले पाण्याखाली
सांगली : पावसाने दिवसभर घेतलेली उसंत आणि कोयना, वारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या कमी करण्यात आलेल्या विसर्गामुळे तूर्त तरी सांगलीवरचा मोठा धोका टळला असला तरी कृष्णेची पाणी पातळी ५२ फुटांवर गेल्याने कृष्णाकाठी आणि सांगली शहरात हाहाकार उडाला आहे. मारुती रोडवरच्या मुख्य बाजारपेठेत व नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. जवळपास १६ हजार कुटुंबे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. तर ५७ रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
१६ हजार कुटुंबांचे स्थलांतर : सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ५२ फुटांवर गेल्याने पाणी मोठ्या प्रमाणात नागरी वसाहतीत शिरले. शनिवारी मारुती रोडवर तीन फुटांपर्यंत पाणी साचले. गावभाग, कोल्हापूर रोड, शामरावनगर, एस.टी स्टँड परिसर, शिवाजी मंडई परिसर, टिळक स्मारक मंदिर परिसर, हरभट रोड, स्टेशन चौक,भारती विद्यापीठ परिसर, वखार भाग, जामवाडी, सर्किट हाऊस परिसरात पाणी शिरले. त्यामुळे जवळपास १६ हजार कुटुंबे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत. महापालिकेने १८ निवारा केंद्रे सुरू केली. शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना जेवण : सांगली शहरातील २०० पूरग्रस्त नागरिकांना कुपवाड शहर शिवसेना आणि गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने भोजन देण्यात आले.
पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदमांकडून पाहणी
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी पालकमंत्री जयंत पाटील आणि सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी स्वंतत्रपणे केली. बाधित लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन उपाययोजनांबाबत प्रशासनाला सूचना केल्या.
डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या युवकाचा शोध सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथे डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी १ पोकलेन व तीन जेसीबी मशीनच्या साहाय्याने ही शोधमोहीम सुरू आहे.
सुमारे दोन एकरहून अधिक भागातील डोंगर कोसळून खाली आल्याने त्या युवकाचा शोध घेण्याचे कठीण आवाहन प्रशासनाच्या समोर आहे. एनडीआरएफच्या २१ जवानांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांचे बॉम्बशोधक पथकाचे कर्मचारीदेखील दाखल झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...