प्रतिनिधी /पणजी Advertisements पूर्ण मगो पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचा दावा करुन भाजपमध्ये सामील झालेले मगोचे आमदार मनोहर उर्फ बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अपात्र ठरवावे, अशी याचना करुन आता सुदिन ढवळीकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्या निवाडय़ाला आव्हान दिले आहे. काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये विलीन झालेल्या 10 आमदारांना सभापतींनी पात्र ठरवले आहे. तसेच सुदिन ढवळीकर यांची याचिका फेटाळताना बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांनाही पात्र ठरवले आहे. काँग्रेसच्यावतीने गिरीश चोडणकर यांनी यापूर्वीच सभापतींच्या निवाडय़ाला आव्हान दिले आहे. ही याचिका आता मुंबई येथे खास खंडपीठासमोर वर्ग करण्यात आली आहे. निवाडय़ाला मुदतीतच आव्हान सभापतींच्या निवाडय़ाला आव्हान देण्यास मगो पक्षाला उशीर झालेला नाही. निवाडय़ानंतर तीन महिन्याच्या आत कधीही आव्हान दिले जाऊ शकते, अशी माहिती सुदिन ढवळीकर यांच्या वकिलांनी दिली. आव्हान याचिका तयार करताना पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सभापतींचा निवाडा म्हणजे ‘पर्वस’ सभापतींनी दिलेला निवाडा म्हणजे ‘पर्वस’ असून न्यायालयासमोर असलेल्या पुराव्या विरुद्ध आहे. एका बाजूने सभापती विधानसभेत मगो पक्षाला स्थान देतात. आमदार सुदिन ढवळीकर अजूनही मगो पक्षाचेच आमदार आहेत हे ते मान्य करतात व दुसऱया बाजूने मगो पक्ष पूर्णपणे भाजपमध्ये विलीन झाल्याचा बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांनी केलेला दावा मान्य करुन त्यांना पात्र ठरवले आहे. मगो पक्षात तशी फूट पडलेली नाही पक्षात दोन तृतीयांश उभी फूट पडली. मोठा गट दुसऱया पक्षात विलीन झाला. त्या गटात पक्षाच्या इतर पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्त्यांसोबत जर आमदारही फुटले तर ते अपात्र ठरु शकत नाहीत, पण मगो पक्षात तशी फूट पडलेली नाही. तरी त्यांना पात्र ठरविल्याने आता सभापतींचा निवाडा रद्दबातल ठरवून दोघाही आमदारांना अपात्र ठरवावे अशी याचना उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. ही याचिकाही आता मुंबई खास खंडपीठासमोर वर्ग होणार आहे. Share