वृत्तसंस्था/ नवी दिल्ली Advertisements काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संरक्षणाशी संबंधित एका संसदीय समितीच्या बैठकीतून वॉकआऊट केला आहे. भारत-चीन सीमेवरील तणावावर चर्चा घडवून आणण्याचा राहुल गांधींचा आग्रह होता, पण समितीच्या प्रमुखाने याची अनुमती दिली नसल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. अनुमती नाकारल्याने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सदस्यांनी बैठकीतून वॉकआऊट केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणावाच्या मुद्दय़ावर चर्चा व्हावी अशी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस खासदारांनी मागणी केली होती. पण समितीचे अध्यक्ष जुएल ओराम यांनी याकरता अनुमती दिली नाही. यामुळे नाराज राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सदस्य बैठकीतून बाहेर पडले. संसदीय समितीच्या बैठकीचे मुद्दे 29 जून रोजीच निश्चित करण्यात आले हेते. पण राहुल गांधी या मुद्दय़ांव्यतिरिक्त विषयावर चर्चा घडवून आणू इच्छित होते, याचमुळे अध्यक्ष ओराम यांनी त्यांची मागणी फेटाळली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी एलएसीच्या मुद्दय़ावर बुधवारीच ट्विट करत मोदी सरकारला लक्ष्य पेले होते. पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झटापटीशी संबंधित एका वृत्ताला ट्विट करत राहुल गांधी यांनी भारत इतका असुरक्षित कधीच राहिला नसल्याचा दावा केला होता. मागील वर्षी डिसेंबरमध्येही राहुल यांनी संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून वॉकआऊट केला होता. त्या बैठकीतही राहुल यांनी निश्चित मुद्दय़ांऐवजी पूर्व लडाखमध्ये देशाची तयारी काय आहे, चीनविरोधातील रणनीति कोणती यावर चर्चा करण्याची मागण्याची केली होती. तेव्हा देखील अध्यक्ष ओराम यांनी त्यांना बोलण्याची अनुमती न दिल्याने राहुल यांनी वॉकआऊट केला होता. Share