comparemela.com


पालघर (प्रतिनिधी) : आज वसई-विरार शहर महानगरपालिकेला एक तप पूर्ण झाले. ३ जुलै २००९ रोजी महानगरपालिकेची स्थापना झाली. या माध्यमातून चार महानगरांनी बाळसे धरले का? करदात्यांनी दिलेल्या कराच्या बदल्यात त्यांना योग्य त्या नागरी सोई-सुविधा मिळाल्या का? नियोजनबद्ध विकास झाला का? पाणी, आरोग्य, वैद्यकीय सेवा व शिक्षण क्षेत्रातील समस्या मार्गी लागल्या का? आणि वसई, विरार, नालासोपारा व नावघर-माणिकपूर या चार महानगरांतील अनधिकृत बांधकामे रोखण्यात प्रशासन यशस्वी झाले का, असे विविध प्रश्न करदात्यांना पडले आहेत.
शेवटचा विषय वगळता इतर प्रश्नी प्रशासनाला माफक प्रमाणात यश मिळू शकले. अनधिकृत बांधकामे रोखण्यात यश आले नाही. पण गेल्या १२ वर्षात ही अधिक संख्येने कशी वाढतील यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय झाला. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून तिची वाटचाल अत्यंत खडतर होती व ती आजही कायम आहे. ग्रामीण भागातील गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर उपप्रदेशात आगडोंब उसळला व त्या प्रश्नांची धग आजही कायम आहे. गावांचा प्रश्न गेली अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तो कधी मार्गी लागेल, हे सांगता येणार नाही.
एका तपानंतर करदात्यांच्या जीवनात काही बदल होऊ शकले का? त्यांचे राहणीमान सुधारले का? त्यांना योग्य त्या नागरी सुविधा मिळाल्या का? दुर्देवाने या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच मिळतात. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बुरसटलेली मानसिकता यास सर्वस्वी जबाबदार आहे. ज्यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये हातमिळवणी होते तेव्हा त्या परिसराचा विकास होत नाही, तर तो परिसर भकास होतो. या महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने परिसर विकासाला प्राधान्य देण्याऐवजी लचके तोडण्याचे काम केले.
अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आणण्यावर भर देण्याऐवजी या अधिकाऱ्यांनी ती अधिक संख्येने कशी वाढतील व त्यातून आपले खिसे कसे भरतील, अशी व्यूहरचना केली. दुर्देवाने त्यास लोकप्रतिनिधींचीही साथ मिळाली. यामुळे या दोघांमध्ये एक अलिखित करार झाला. ‘आपण दोघे भाऊ-भाऊ, एकत्र येऊन धुवून पुसून खाऊ,’ असे त्याचे स्वरूप होते व ते आजही कायम आहे. त्यामुळे करदाते अशा निर्णयाप्रत आले आहेत की पूर्वी होत्या त्या नगरपरिषदा व ग्रामपंचायतीच बऱ्या होत्या. त्याकाळी निदान आमची कामे तरी जलदगतीने व्हायची. पण आज महानगरपालिकेच्या काळात आमची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी झाली आहे.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Virar ,Vasai ,Palghar , ,Officeb Education ,Municipal Corporation ,Medical Officeb Education ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,விரார் ,வசாய் ,பல்காற் ,நகராட்சி நிறுவனம் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.