Three And A Half Thousand Tourists Used To Come To Matheran A Week Before Corona, Now Only Four Hundred; News And Live Updates
पर्यटकांच्या प्रतीक्षेत:माथेरानमध्ये कोरोनापूर्वी आठवड्याला येतसाडेतीन हजार पर्यटक, आता केवळ चारशे
माथेरान8 तासांपूर्वी
कॉपी लिंक
1 मार्च 2020 पासून आजवर 3.5 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज
निसर्गाचे लेणे म्हणून प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील माथेरान हे जागतिक पर्यटनस्थळ सध्या पर्यटकांविना ओस पडले आहे. आधी कोरोना आणि आता पर्यटकांमधील कोरोनाबद्दलची भीती या मुख्य कारणामुळे माथेरानकरांवर उपासमारीची वेळ आली आहे. माथेरान येथील चप्पल, रानमेवा आणि विविध प्रकारची सजलेली दुकाने ही पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात दैनंदिन ताण विसरून निवांत असलेले पर्यटक अनलॉकनंतरही कोरोनाच्या भीतीमुळे अद्यापही येत नाहीत. यामुळे घोड्यांच्या टापांचा आवाजही थांबला आहे.
माथेरान येथे १०० पेक्षा अधिक हॉटेल्स, १५० पेक्षा अधिक लॉजिंग आहेत. ४६० घोडे आणि ९४ सायकल रिक्षा आहेत. ४३०० एवढी माथेरानची लोकसंख्या आहे. सगळे व्यवसाय हे पर्यटकांवरच अवलंबून असल्यामुळे सध्या येथील रहिवाशांवर दैनंदिन गरजा भागवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दीड वर्षापासून माथेरानचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. इको सेन्सेटिव्ह झोन असल्यामुळे कारखानदारी, मोठे उद्योग येथे येत नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीमुळे काय करायचे हा मोठा प्रश्न येथील लोकांना पडला आहे.
व्यावसायिक कर्जबाजारी
सप्टेंबर ते मार्च हा माथेरानचा पर्यटन काळ असतो. मागील वर्षी हंगामातच लॉकडाऊन लागल्याने व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. वीज बिल, पाणीपट्टी भरण्यासाठीदेखील व्यावसायिकांकडे पैसे राहिले नाहीत. सरकारने आमची उपासमार बंद करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
नगर परिषदेचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी
माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवासी कर आकारला जातो. प्रौढांसाठी ५० रुपये, तर लहानांसाठी २५ रुपये दर आहे. लॉकडाऊनआधी दिवसाला एक लाख रुपये उत्पन्न प्रवासी करातून माथेरान नगर परिषदेला मिळायचे. १ मार्च २०२० ते आजपर्यंत १.२० कोटी रुपये उत्पन्न नगर परिषदेला मिळाले आहे. तसे पाहता ४.८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असताना ३.५ कोटींपेक्षा अधिक नुकसान परिषदेला झाले आहे. दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे सध्या माथेरान येथील विकासकामेदेखील थांबली आहेत.
अश्वपालांवर मजुरी करण्याची वेळ
येथे फिरण्यासाठी घोडा हे महत्त्वाचे वाहन आहे. आधी कोरोना आणि आता कोरोनाबाबतची भीती यामुळे पर्यटक येत नसल्यामुळे अश्वपालांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. उभा घोडा पोसण्यासाठी प्रतिदिन २०० रुपये खर्च येतो. त्यावरच अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पण सध्या घोड्यांनाच काही काम नसल्यामुळे आम्ही मजुरी करतो आणि कुटुंबासह घोड्याचा सांभाळ करतो, असे अश्वपाल रामा शिंगाडे आणि बाळू खरात यांनी सांगितले.
माथेरानमध्ये १०० टक्के लसीकरण करणार
माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी याबाबत बोलताना सध्या माथेरान नगर परिषदेची आणि येथील रहिवाशांची परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. एरवी प्रदूषणमुक्त शुद्ध हवा आणि गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पण अनलॉक झाल्यानंतरही पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. आजपर्यंत चाळीस वर्षांवरील ९९ टक्के रहिवाशांचे लसीकरण झाले आहे तसेच १८ पेक्षा अधिक वय असलेल्या ३० टक्के रहिवाशांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. येत्या दहा दिवसांत माथेरान येथील लसीकरण १०० टक्के पूर्ण होणार आहे. तसेच माथेरान येथील बाजार, दुकाने या भागातील सॅनिटायझेशन दिवसातून दोन वेळा केले जाते. या कारणांमुळे माथेरान पर्यटकांसाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. फक्त पर्यटकांनी येताना आणि वावरतांना शासनाने घालून दिलेल्या कोरोनाबाबत नियमांचे पालन करावे, असे आवाहन जाधव यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...
अॅप उघडा