August 4, 2021
20
पुणे-बेंगलोर मार्गावर पूर ओसरताच पहिले वाहन सुटले ते सिंधुदुर्गचे
कोल्हापूर पोलिसांच्या सहकार्यामुळे एक नंबरला सोडला टँकर
जिल्हाधिकाऱयांनी कोल्हापूर पोलिसांचे केले विशेष अभिनंदन
कर्नाटक शासनाकडूनही मिळाली एका टँकरची मदत
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
Advertisements
एका मागाहून एक संकटे येत असताना पुणे-बेंगलोर महामार्गावरून ऑक्सिजन लिक्विड घेऊन येणारा सिंधुदुर्गचा टँकर पुरामुळे ट्राफिकमध्ये अडकला होता. मात्र, पूर ओसरताच पहिले वाहन कुठले सुटले असेल, तर ते सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर. त्यासाठी कोल्हापूर वाहतूक पोलिसांनी फार मोठी मदत केली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूरचे पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच पूरपरिस्थितीत सर्व मार्ग बंद असताना धारवाड येथून एक ऑक्सिजन टँकर अनेक अडचणींवर मात करत सिंधुदुर्गात पाठवला गेला, त्याबद्दल त्यांनी कर्नाटक शासनाचेही आभार मानले.
नैसर्गिक आपत्ती, कोरोना अशा एका मागोमाग एक येणाऱया संकटात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. विशेषतः कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी जीव जाऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मितीचे प्लान्ट उभे करत जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण केला. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळावेळी विद्युत सेवा कोलमडलेली असतानाही ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही.
गेल्याच आठवडय़ात संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडवला होता. पूरपरिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे पुन्हा एकदा ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण होण्याची शक्मयता निर्माण झाली होती. अशावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन पुरवठय़ाचे नोडल ऑफिसर तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांनी सर्व जिल्हय़ांशी समन्वय ठेवून ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण झाला तरी ऑक्सिजन लिक्विड रायगड जिल्हय़ातून आणावे लागते. परंतु 23 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथे पाणी आल्याने तसेच चिपळूण मध्येही मोठा पूर येऊन शहरच पाण्याखाली जात महामार्ग बंद होता. त्यामुळे रायगडहून ऑक्सिजन लिक्विडचा टँकर आणायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला होता. मुंबई-गोवा महामार्ग कधी सुरू होणार, हे सांगता येत नव्हते. त्यामुळे रायगडहून पुणे, कोल्हापूरमार्गे टँकर आणायचे ठरले. त्याप्रमाणे टँकर कोल्हापूरमार्गे यायला निघाला. परंतु कोल्हापूरला पोहोचायच्या आधीच पुणे-बेंगलोर महामार्गावर पुराचे पाणी येऊन तो मार्गही बंद झाला. त्यामुळे या मार्गावर 30-40 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच हा ऑक्सिजन लिक्विड घेऊन येणारा टँकर अडकला होता. पाणी ओसरेपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार ऑक्सिजन पुरवठा नोडल ऑफिसर यांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क करून सिंधुदुर्गचा ट्राफिकमध्ये अडकलेला टँकर बाहेर काढून पाणी ओसरताच सिंधुदुर्गात पाठविण्याची विनंती केली. त्यावर पूर ओसरताच प्रथम सिंधुदुर्गचा टँकर सोडण्याची ग्वाही कोल्हापूर पोलिसांनी दिली.
कोल्हापूर पोलिसांनी केली मदत
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देत कोल्हापूर जिल्हय़ातील पेठवडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष शेवाळे आणि शिरोलीचे पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्यासह पोलिसांच्या टीमने 40 किलोमीटर लांबलचक लागलेल्या वाहनांच्या रांगांमधून सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा ऑक्सिजन लिक्विड टँकर शोधून काढला. एवढय़ा मोठय़ा ट्राफिकमधून तो टँकर सर्व वाहनांच्या पुढे आणून एक नंबरला ठेवला. पुणे-बेंगलोर महामार्गावरील पाणी ओसरताच कोल्हापूर पोलिसांनी प्रथम या टँकरला सोडले. अडचणीच्यावेळी कोल्हापूर पोलिसांनी तत्परता दाखवून सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर पोलीस अधिकारी संतोष शेवाळे, किरण भोसले आणि कोल्हापूर पोलिसांचे विशेष अभिनंदन केले.
दररोज लागतो पाच मेट्रिक टन ऑक्सिजन
सिंधुदुर्गला सद्यस्थितीत दररोज पाच मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. पूर्वी जास्त लागत होता. आठ जूनला सर्वाधिक 9.6 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला. आता रुग्ण कमी झाल्याने दररोज पाच मेट्रिक टनच्या आसपास ऑक्सिजन लागते. जेवढी गरज असते त्याच्या तिप्पट ऑक्सिजनचा साठा केंद्र शासनाच्या नियमावली नुसार साठा करून ठेवला जातो. त्यामुळे 23 जुलैला सर्वत्र पूरपरिस्थिती असतानाही दोन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा उपलब्ध होता. परंतु पूरस्थिती अधिक दिवस राहिली आणि ऑक्सिजन लिक्विड आणायला अडचणी निर्माण झाल्या तर दक्षता म्हणून अन्य ठिकाणाहून ऑक्सिजन आणण्याच्या हालचाली सुरू केल्या.
कर्नाटकातूनही मिळाला ऑक्सिजन
मुंबई-गोवा महामार्ग बंद होता, पुणे-बेंगलोर मार्गही बंद होता. दोन्ही मार्ग बंद असल्याने कर्नाटक किंवा गोवा राज्यातून ऑक्सिजन आणण्याच्या हालचाली सुरू केल्या. गोवा राज्यातून ऑक्सिजन मिळत नव्हते. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून कर्नाटकहून आण्यासाठी प्रयत्न केले. त्याप्रमाणे धरवाड येथून ऑक्सिजनचा एक टँकर आणला. मुसळधार पाऊस असल्याने वाट काढत काढत सिंधुदुर्गात टँकर आणला गेला, त्याबद्दलही जिल्हाधिकाऱयांनी कर्नाटक शासनाचे आभार मानले.
Share
previous post