वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी यापूर्वी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघातील शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर हे जखमी झाल्याने त्यांच्या जागी सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ आणि मध्यफळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
Advertisements
इंग्लंड दौऱयासाठी यापूर्वी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये बंगालचा सलामीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरनला तसेच अवेश खानला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. पण अवेश खान जखमी झाल्याने तो मायदेशी परत आला आहे. भारताच्या वरिष्ठ निवड समितीने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांची बदली खेळाडू म्हणून निवड केल्याची माहिती मंडळाचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.
सूर्यकुमार यादवची लंकेच्या दौऱयात कामगिरी चांगली झाली असल्याने त्याची इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. मुंबई तसेच पश्चिम विभाग संघाकडून खेळणाऱया सूर्यकुमार यादवने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 44 धावांच्या सरासरीने 1400 धावा जमविल्या आहेत. भारतीय निवड समितीने फिरकी गोलंदाज जयंत यादवला वॉशिंग्टनच्या जागी यापूर्वीच निवडले होते. पण त्याची सध्या गरज भासत नसल्याने त्याला पुन्हा वगळले आहे.
भारतीय कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, के.एल. राहुल, साहा, ईश्व़रन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव. राखीव खेळाडू- प्रसिद्ध कृष्णा, नागवासवाला.
Share