July 24, 2021
5
ऑलिम्पिक फुटबॉल : जर्मनी, अर्जेन्टिना यांना पराभवाचा धक्का, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे विजय
वृत्तसंस्था /योकोहामा
Advertisements
इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये एव्हर्टन क्लबकडून खेळणाऱया रिचर्लिसनने नोंदवलेल्या नोंदवलेल्या बळावर ब्राझीलने ऑलिम्पिक फुटबॉलमधील सलामीच्या सामन्यात जर्मनीचा 4-2 असा पराभव केला. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यजमान जपान, आयव्हरी कोस्ट यांनीही विजय मिळविले तर अर्जेन्टिनाला पराभवाचा धक्का बसला.
रिचर्लिसनने पहिल्या अर्ध्या तासाच्या आतच हॅट्ट्रिक पूर्ण केली. सातव्या मिनिटाला त्याने पहिला गोल नोंदवला. प्रथम त्याने मारलेला फटका जर्मनीचा गोलरक्षक फ्लोरियन म्युलरने ब्लॉक केल्यानंतर परतला आणि त्यावर त्याने हा गोल केला. दुसरा गोल नोंदवण्यासाठीही त्याला फार प्रतीक्षा करावी लागली नाही. 22 व्या मिनिटाला त्याने हेडरवर दुसरा आणि 30 व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवत हॅट्ट्रिक पूर्ण केली. तीन गोलांची भक्कम आघाडी मिळाल्यानंतर जर्मनीचे आक्रमण थोपवण्यात त्यांना पूर्ण लक्ष केंद्रित करता आले. पण उत्तरार्धात जर्मनीला ब्राझीलची आघाडी कमी करण्यात यश आले. नदीम अमिरी व रॅग्नर ऍश यांनी हे गोल नोंदवले. ब्राझीलने जर्मनीला बरोबरी साधण्याची संधी मात्र दिली नाही तर स्टॉपेज टाईममध्ये त्यात आणखी एका गोलाची भर घातली. पॉलिन्होने हा गोल नोंदवत ब्राझीलचा मोठा विजय साकार केला. गट ड मध्ये ब्राझीलने आघाडी घेतली असून सौदी अरेबियावर 2-1 असा विजय मिळविणारे आयव्हरी कोस्ट दुसऱया स्थानावर आहे.
अर्जेन्टिना चकित
गट क मधील सामन्यात दोन वेळचे ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेन्टिनाला मात्र ऑस्ट्रेलियाने 2-0 असा पराभवाचा धक्का दिला. 2008 नंतर ऑलिम्पिकमध्ये प्रथमच खेळणाऱया ऑस्ट्रेलियाने 14 व्या मिनिटाला लॅचलन वेल्सच्या गोलवर आघाडी घेतली. पूर्वार्धाच्या अखेरच्या टप्प्यात दोनदा पिवळे कार्ड मिळाल्याने फ्रान्सिस्को ओर्टेगाला बाहेर घालविण्यात आले. त्यामुळे अर्जेन्टिनाला दहा खेळाडूंनिशीच खेळावे लागले. 80 व्या मिनिटाला मार्को टिलिओने दुसरा गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
या गटात ऑस्ट्रेलिया आघाडीवर असून इजिप्त व स्पेन संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत. या दोन संघांतील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता.
यजमान जपानचा विजय
टोकियो स्टेडियमवर झालेल्या गट अ मधील सामन्यात मायदेशातच होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांशिवाय खेळताना जपानच्या खेळाडूंना वातावरणाशी जमवून घेणे जड गेले. मात्र त्यांच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात करून विजयी सलामी दिली. ताकेफुसा कुबोने एकमेव गोल नोंदवत त्यांना हा विजय मिळवून दिला. 71 व्या मिनिटाला कुबोने गोलच्या दिशेने जोरदार कर्लिंग फटका मारला, तो बारला लागून जाळय़ामध्ये गेला. 20 वर्षीय कुबोला रियल माद्रिदने करारबद्ध केले असून त्याला त्या संघाकडून अद्याप एकाही सामन्यात खेळता आलेले नाही.
न्यूझीलंडची कोरियावर मात
गट ब मधील सामन्यात ख्रिस वूडने गोल नोंदवून न्यूझीलंडला दक्षिण कोरियावर 1-0 असा विजय मिळवून दिला. इबाराका काशिमा स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला आणि त्यासाठी शंभरहून अधिक प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. टोकियोमध्ये कोरोना आणीबाणी जाहीर झाली आहे. मात्र काशिमा स्टेडियम आणीबाणी क्षेत्राच्या बाहेरच्या बाजूस असल्याने तेथे मर्यादित प्रेक्षकांना मुभा देण्यात आली होती.
Share