वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संक्रमणाने जगभरात मोठे नुकसान घडविले आहे. या महामारीने आतार्यंत लाखो लोकांचा जीव घेतला असून लाखो मुले या काळात अनाथ झाली आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत जगभरातील 15 लाख मुलांनी स्वतःचे आईवडिल किंवा त्यांच्यापैकी एकाला गमाविले आहे. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका नव्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.
Advertisements
अहवालानुसार यातील एक लाख 90 हजार मुले भारतातील आहेत. या मुलांनी कोरोनाकाळात स्वतःच्या आईवडिलांपैकी कुठलेही एक, कस्टोडियल आजी-आजोबा यांना गमाविले आहे. कोरोना महामारीच्या प्रारंभीच्या 14 महिन्यांमध्ये 10 लाखांहून अधिक मुलांनी स्वतःचे आईवडिल दोघेही किंवा यातील कुणा एकाला गमाविले आहे. तर उर्वरित 50 हजारांनी त्यांच्यासोबत राहणाऱया आजी-आजोबांना या महामारीने गमाविले आहे.
भारतात मार्च-एप्रिल 2021 दरम्यान अनाथाश्रमांमधील मुलांच्या संख्येत 8.5 पट वाढ झाली आहे. या कालावधीत देशात अनाथ मुलांची संख्या 5,091 वरून वाढत 43,139 वर पोहोचली आहे. ज्या मुलांनी आईवडिल किंवा देखभाल करणाऱयांना गमाविले आहे, त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेत खोलवर अल्पकालीन तसेच दीर्घकालीन प्रतिकूल प्रभाव पडण्याचा धोका आहे. तज्ञांनी आजार, शारीरिक शोषण, लैंगिक हिंसा आणि किशोर गर्भावस्थेच्या जोखिमीवरून चिंता व्यक्त केली आहे.
Share