वार्ताहर/ कराड
ऐतिहासिक सदाशिवगडावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून रस्ता करण्यात येत आहे. यामुळे गडाच्या विकासासह सदाशिवाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गड विकासास कोणी खोडा घालू नये. विरोध करणाऱयांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. मात्र केवळ स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी विरोध केलाच तर विरोध मोडून रस्ता करण्यासाठी पाच गावातील ग्रामस्थ सक्षम आहेत, असा इशारा पाच गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.
Advertisements
हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, बाबरमाचीच्या सरपंच सुनीता कदम, उपसरपंच राहुल जांभळे, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, विरवडेचे सहय़ाद्रि करखान्याचे संचालक रामदास पवार, अधिक सुर्वे, ऍड. चंद्रकांत कदम, प्रल्हादराव डुबल, ऍड. दादासाहेब जाधव, पोलीस पाटील मुकुंदराव कदम, दीपक लिमकर, प्रकाश पवार, एस. के. डुबल, सतीश पवार, जनार्दन डुबल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ऍड. चंद्रकांत कदम व प्रल्हादराव डुबल म्हणाले की, गडावर सदाशिवाचे प्राचीन शिवमंदिर आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या हजारो ग्रामस्थांचे सदाशिव श्रद्धास्थान आहे. मात्र वयोवृद्ध, आजारी, अपंग, अनेक महिला व ज्यांना वेळेअभावी गडावर चालत जाणे शक्य नाही, असे लोक दर्शनापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे गडावर रस्ता करावा, असे पाच गावांच्या ग्रामसभांत ठराव करण्यात आले आहेत. पाच गावे, सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गडावर रस्ता व शिवसृष्टी प्रकल्प साकारण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यांनी रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. सदाशिवगडाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या चार माच्यांनी गडाच्या विकासाठी आजवर मोठय़ा प्रमाणात योगदान दिले आहे. चार माच्यांनी गडाच्या विकासाठी नवनवीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास कुणी खोडा घालू नये.
सदाशिवगड ही चार माच्यांसह परिसरातील गावांची अस्मिता आहे. गडाच्या संरक्षण व संवर्धनासाठी चार माच्या सक्षम आहेत. गडाच्या विकासकामांत आजवर ग्रामस्थांनी कधी विरोध केला नाही. त्यामुळे चार गावचे ग्रामस्थ करीत असलेल्या विकासकामांना कोणी विरोध करून विध्वंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा विरोध करणाऱयांचा विरोध मोडण्यासाठी ग्रामस्थ सक्षम आहेत, असा इशारा प्रकाश पवार यांनी दिला.
सदाशिवगडावर रस्ता व्हावा म्हणून पाच गावच्या ग्रामसभांसह विभागातील राजकीय, सामाजिक, पर्यावरण, नाभिक, व्यापारी, रिक्षा युनियन, अपंग, गुरव समाज आदी संस्था व संघटनांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे. सदाशिवगड विभागातील एकाही संस्थेचा रस्त्याला विरोध नाही. मात्र काही लोकांच्या स्वार्थात बाधा येत असल्याने हे लोक बाहेरील संस्थांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन विरोध दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदाशिवगड व विभागातील लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. पिढय़ानपिढय़ा सदाशिवगडाच्या पायथ्याला रहाणाऱया लोकांनी आतापर्यंत गडाचे संवर्धन व संरक्षणाचे कार्य केले आहे. यापुढे सदाशिवगड व लोकांची बदनामी केल्यास खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा दीपक लिमकर, प्रशांत यादव, शिवाजीराव डुबल, महादेव माने, विद्या घबाडे, सतीश पवार यांनी दिला आहे. यावेळी, कल्याणराव डुबल, शंकरराव कदम, पितांबर गुरव, अवधुत डुबल, विनोद डुबल, उमेश माने, कृष्णत काळे, कुमार इंगळे, राजू काटवटे, शंकर खोचरे, बाबासाहेब पवार, सर्जेराव पानवळ, दिपक पाटील, गणेश घबाडे, प्रशांत थोरात, विक्रम मोकाशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्ता होणारच-प्रशांत यादव
सदाशिवगड विभागातील सर्व गावातील, सर्वपक्षियांच्या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. रस्त्याचा सर्व्हे करण्यात आला आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून सदाशिवगडावरील रस्ता व शिवसृष्टीसारखे इतिहासाला उजाळा देणारे काम उभा रहात आहे. त्यास कोणीही खोडा घालू नये, गडाच्या विकासासाठी विरोध करणाऱयांनी सोबत यावे. त्यांच्या सूचनांचे स्वागतच करू अन्यथा विरोध मोडून रस्ता होणारच, असा इशारा प्रशांत यादव यांनी दिला आहे.
Share