वार्ताहर/ ताम्हाने
संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक येथील धरणाला गळती होत असल्याचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर या विभागाच्या अधिकाऱयांनी भेट दिली आणि खबरदारीचा उपाय म्हणून धरणातील पाणी सांडव्याव्दारे सोडून देण्यात येत आहे.
Advertisements
जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी धरण परिसराला भेट दिली आणि तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. या धरणाची पाहणी करणारे कनिष्ठ अभियंता सिजी धामापूरकर यांनी तात्काळ निर्णय घेतला. पाणी सोडून धरण रिकामे करण्याचे ठरवण्यात आले. तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली.
अधिकाऱयांनी धरण परिसराला भेट दिली, तेव्हा तेथे शिवसेना विभाग प्रमुख सत्यवान शिंदे, उपविभाग प्रमुख सचिन ईप्ते, सरपंच जोशी, उपसरपंच अमोल जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गेले दोन दिवस निवे धरणाला गळती लागल्याची एकच चर्चा निवे दशक्रोशीत सुरू होती. याबाबत सोशल मीडियावर देखील उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होती आणि त्यानंतर शुक्रवारी विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी पाहणी केली. याबाबत कनिष्ठ अभियंता सिजी धामापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की धरणाला गळती नसून धरण भरल्यानंतर फिल्टरमधून पाणी गळती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन वर्षापूर्वी या धरणाला गळती लागली होती. त्यात धरणाची जॅकवल खचली गेली होती. ही गळती काढण्यासाठी दोन वर्षापूर्वी पाणी सोडून दुरुस्तीचे काम करण्यात आले होते आणि हे काम करून देखील जर का ही गळती असेल तर मग काम कश्या प्रकारे झाले याबाबत प्रश्न चिन्ह उभे राहत आहे. सध्या काहीही सांडव्याव्दारे पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून धरण रिकामे करण्यात येत आहे.
Share