भोपाळ / वृत्तसंस्था
Advertisements
काँग्रेसचे ‘संकटमोचक’ कमलनाथ यांचे पुन्हा राष्ट्रीय राजकारणात पुनरागमन होऊ शकते. दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची कमलनाथ यांनी भेट घेतली आहे. कमलनाथ यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
नेतृत्व संकटाला तोंड देणारा काँग्रेस पक्ष कमलनाथ यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमू शकतो. सोनिया गांधी यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याने त्या राजकारणात पूर्णवेळ सक्रिय राहू शकत नाहीत. याचमुळे काँग्रेसने कार्यकारी अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून दिल्लीत विचारविनिमय सुरू आहे. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा देखील पोहोचल्या आहेत.
मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होण्यापूर्वी कमलनाथ यानी राज्यात स्वतःला छिंदवाडापुरतीच मर्यादित ठेवले होते. कमलनाथ हे राष्ट्रीय राजकारणातच अधिक सक्रिय राहायचे. राष्ट्रीय राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द असल्याने पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. अनेक राज्यांमधून विरोधाचा सूर उमटत असताना कमलनाथ हेच स्थिती सांभाळू शकतात असे पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. कमलनाथ हे नेहमीच गांधी परिवाराच्या मर्जीतील नेते राहिले आहेत. पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेला कलह शमविण्याची जबाबदारीही कमलनाथ यांना दिली जाण्याची शक्यता आहे.
2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले होते. 15 वर्षांनी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मध्यप्रदेशात सत्ता अनुभवली होती. पण 17 महिन्यांमध्येच काँग्रेसचे सरकार कोसळले. तरीही कमलनाथ हे मध्यप्रदेशातच सक्रिय राहिले आहेत. मध्यप्रदेश सोडून जाणार नसल्याचे कमलनाथ वारंवार म्हणत आले आहेत.
Share