July 16, 2021
5
सीड बॉल उपक्रमाचे सर्वत्र कौतुक : मालवण सभापती, उपसभापतींचा पुढाकार
प्रतिनिधी / मालवण:
Advertisements
मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वकांक्षी असा सीड बॉल संकल्प केला आहे. यासाठी तालुक्यातील शिक्षक व मुलांच्या सहाय्याने तब्बल 22 हजार सीड बॉल तयार केले आहेत. सीड बॉल जंगलमय भागात टाकून अभिनव पद्धतीने वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जेणेकरून जंगलमय भागात 22 हजार वृक्षांची लागवड होण्याची आशा यातून व्यक्त करण्यात आली आहे. सभापती पाताडे हे नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांनी राबविलेल्या सीड बॉलचेही आता कौतुक होताना दिसत आहे.
सीड बॉल संकल्पनेबाबत बोलताना सभापती पाताडे म्हणाले, वन्य प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येत असून त्यामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान होत आहे. उन्हाळी शेती करण्यास शेतकरी धजावत नसल्याचे जाणवते. त्यामुळेच दुहेरी दृष्टीकोनातून ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद
उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनीही या उपक्रमासाठी महत्वाचे सहकार्य केले आहे. यामुळे आठवडय़ात एकाच दिवशी तालुक्यातील प्रत्येक केंद्रनिहाय त्या भागातील पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, शिक्षक यांच्या उपस्थितीत सीड बॉल फेकण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामुळे वृक्ष संवर्धनासाठीही एक पाऊल पंचायत समितीचे पुढे असाही नारा देण्यात आला आहे.
सीड बॉल म्हणजे काय?
सीड बॉल म्हणजे फळबिया एकत्र करून शेण मिश्रित माती वापरून गोळे तयार केले जातात. ते जंगल भागात, मोकळ्य़ा भागात, डोंगर-दऱया-उजाड भागात फेकले जातात. जेणेकरून पावसामुळे त्यातील बिया रुजून येतील. मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे निसर्ग समतोल राखण्यासाठी याचा उपयोग होतोच परंतु फळबिया वापरल्याने जंगल भागात फळझाडे वाढून वन्य प्राण्यांना खाद्य मिळण्यास हातभार लागणार आहे.
Share