वृत्तसंस्था/ पुरी
कोरोना काळादरम्यान ओडिशाच्या पुरी येथे सोमवारी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात आली आहे. पण कोरोना संकटामुळे यंदा देखील भाविकांना रथयात्रेत सामील होण्याची अनुमती मिळालेली नाही. केवळ मंदिर परिसराशी निगडित लोक आणि काही अन्य व्यक्तींना रथयात्रेत सामील होण्याची अनुमती मिळाली आहे.
Advertisements
रथयात्रेच्या मार्गावर संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे अन्य लोकांना रथयात्रेत सहभागी होण्यापासून रोखता आले आहे. लोकांना घरात बसून रथयात्रेचा आनंद घेता यावा अशी व्यवस्था करण्यात आली.
गुजरातच्या अहमदाबाद येथेही सोमवारी सकाळी 7.10 वाजता रथयात्रेस प्रारंभ झाला. अहमदाबाद आणि पुरी दोन्ही ठिकाणी रथयात्रेत सामील होणाऱयांपासून रथ खेचणाऱया व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करविण्यात आली होती. अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्यांना रथयात्रेत सामील होण्याची अनुमती मिळाली आहे.
अहमदाबामध्ये जगन्नाथ रथयात्रेचा मार्ग सुमारे 13 किलोमीटर लांबीचा होता. सर्वसाधारणपणे ही यात्रा पूर्ण होण्यास 10 तासांचा कालावधी लागतो, पण कोरोना काळात भाविकांचा सहभाग नसल्याने ही यात्रा सुमारे 4 तासांमध्ये पूर्ण झाली आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सोन्याचा झाडू (पाहिंद विधी) मारला आहे. केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शाह देखील सध्या अहमदाबाद येथे आहेत. त्यांनी आरतीमध्ये कुटुंबीयांसोबत भाग घेतला आणि भगवान जगन्नाथची पूजा केली आहे.
भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेच्या शुभदिनी सर्व देशवासीयांना विशेषकरून ओडिशातील सर्व भाविकांना माझ्या शुभेच्छा. भगवान जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने सर्व देशवासीयांचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण व्हावे अशी प्रार्थना करत असल्याचे राष्ट्रपतींनी ट्विट करत म्हटले आहे.
Share