वृत्तसंस्था/ ढाक्का
बांगलादेश संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू 35 वर्षीय मेहमुदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. बांगलादेशचा संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱयावर असून उभय संघातील हरारे स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर एकमेव कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील खेळाच्या तिसऱयादिवशी मेहमुदुल्लाने कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली.
Advertisements
सामना सुरू असताना अचानक मेहमुदुल्लाहने निवृत्तीचा निर्णय घेत अनपेक्षित धक्का दिल्याने संघाच्या कामगिरीवर विपरित नकारात्मक परिणाम होवू शकतो, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमुल हसन पेपॉन यांनी म्हटले आहे. गत फेब्रुवारीमध्ये मेहमुदुल्लाहने कसोटी क्रिकेटमध्ये पाकविरूद्ध पुनरागमन केले होते. मेहमुदुल्लाहचा हा 50 वा कसोटी सामना होता. या सामन्यात त्याने आपले पाचवे शतक आठव्या क्रमांकावर फलंदजीस येत नोंदविले होते. मेहमुदुल्लाहने या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 1 षटकार, 17 चौकारांसह नाबाद 150 धावा झळकविल्या होत्या. तसेच तस्किन अहमदबरोबर नवव्या गडय़ासाठी 191 धावांची भागीदारी केली होती. मेहमुदुल्लाहने 2009 साली कसोटीत पदार्पण केले होते.
Share