July 9, 2021
14
विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस : फेडररचे आव्हान समाप्त, फेलिक्स ऑगरही पराभूत
वृत्तसंस्था /विम्बल्डन
Advertisements
आठवेळा जेतेपद मिळविलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचे यावेळी या स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले तर इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने कॅनडाच्या फेलिक्स ऑगरची स्वप्नवत घोडदौड रोखत पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. फेडररला हरविणाऱया पोलंडच्या हय़ुबर्ट हुर्काझशी त्याची उपांत्य लढत होईल. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांना पराभव स्वीकारावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
सेंटर कोर्टवर झालेल्या लढतीत फेडररला चौदाव्या मानांकित हय़ुबर्ट हुर्काझने 6-3, 7-6 (7-4), 6-0 असे हरविले. दुसरा सेट वगळता ही लढत तशी एकतर्फीच झाली. फेडरर 22 व्या वेळी या स्पर्धेत खेळत होता. त्याची ही कदाचित शेवटची विम्बल्डन स्पर्धा असल्याने मैदान सोडतान सर्व प्रेक्षकांनी त्याला टाळय़ा वाजवून मानवंदना दिली. मागील वर्षी त्याच्या उजव्या गुडघ्यावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्या होत्या आणि सुमारे 12 महिने तो टेनिसपासून दूर राहिला होता. विम्बल्डनमध्ये येण्याआधी त्याने या मोसमात केवळ आठ सामने खेळले होते. येत्या 8 ऑगस्ट रोजी तो 40 वर्षे पूर्ण करणार असल्याने तिशीमधील त्याची ही शेवटचीच स्पर्धा आहे. त्याने आजवरच्या कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. पोलंडच्या 24 वर्षीय हुर्काझला यापूर्वी कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिसरी फेरीही पार करता आली नव्हती. दोन वर्षापूर्वी याच स्पर्धेच्या तिसऱया फेरीत जोकोविचकडून तो पराभूत झाला होता. येथील सामन्यात फक्त दुसऱया सेटमध्ये त्याला फेडररकडून प्रतिकार झाला. बुधवारी जोकोविच व कॅनडाचा डेनिस शापोव्हॅलोव्ह यांनीही उपांत्य फेरी गाठली आहे. जोकोविचला एकूण सहावे व सलग तिसरे विम्बल्डन जेतेपद मिळविण्याची संधी मिळाली आहे.
बेरेटिनीची आगेकूच
दुसऱया एका सामन्यात इटलीच्या बेरेटिनीने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ऍलियासिमेचा 6-3, 5-7, 7-5, 6-3 असा पराभव करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा इटलीचा तो दुसरा खेळाडू आहे. 25 वर्षीय बेरेटिनीला सलग चौथ्या सामन्यात सरळ सेट्सनी विजय मिळविण्याची संधी मिळाली होती. पण 20 वर्षीय फेलिक्स ऑगरने दुसऱया सेटमध्ये प्रतिआक्रमण करीत सेट जिंकून बरोबरी साधली होती. मात्र ताकदवान फर्स्ट सर्व्ह आणि जबरदस्त फोरहँड्सच्या बळावर बेरेटिनीने नंतरचे दोन सेट्स जिंकून आगेकूच केली.
सानिया-बोपण्णाचा संघर्षानंतर पराभव
मिश्र दुहेरीत भारताचे आव्हान तिसऱया फेरीत समाप्त झाले. रोहन बोपण्णा व सानिया मिर्झा यांनी संघर्ष करूनही 14 व्या मानांकित जीन ज्युलियन रॉजेर व आंद्रेया क्लेपॅक यांच्याकडून त्यांना 6-3, 3-6, 11-9 असा पराभव स्वीकारावा लागला. सर्व्हिस व नेटजवळील खेळात बोपण्णाने भक्कम प्रदर्शन केले. पण सानियाची सर्व्हिस सतत दडपणाखाली येत राहिली. या सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय येत राहिला. सानियाने पुनरागमन केल्यानंतर फारसे टेनिस खेळलेले नाही. त्यामुळे सर्व्हिससाठी तिला झगडावे लागत आहे. ऑलिम्पिकआधी तिच्यासाठी ही शेवटची टेनिस स्पर्धा होती. ऑलिम्पिकमध्ये ती अंकिता रैनासमवेत महिला दुहेरीत खेळणार आहे.
Share