July 7, 2021
9
सभापती स्मिता हुलवान यांचा आरोप; फौजदारी कारवाईची मागणी
प्रतिनिधी/ कराड
Advertisements
कृष्णा कारखान्यात विजयी पॅनेलच्या अभिनंदनाचे फ्लेक्स नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी शनिवार पेठेत लावताना परवानगी घेतलेली नाही. त्याचे लेखी उत्तर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले आहे. माझी तक्रार दाखल होताच ते फ्लेक्स गायब झाले आहेत. नगराध्यक्षा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या बैठकीत केलेल्या ठरावाचे त्यांनीच अवमूल्यन केले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह त्यांच्या पतीवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व ठरावाचे अवमूल्यन केल्याबद्दल पालिकेने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा कारखाना निवडणुकीत सहकार पॅनेल विजयी झाले. त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स कराडात एक जुलै रोजी नगराध्यक्षा व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी शनिवार पेठ, शाहू चौक व बनपुरीकर कॉलनी परिसरात लावले. या फ्लेक्ससाठी नगरपरिषेदची परवानगी घेतली आहे का, याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यावर अशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असे उत्तर मुख्याधिकारी रमाकांते डाके यांनी दिले आहे. त्यामुळे त्या दोघांवर कायदेशीर करावाईसाठी आम्ही आग्रही आहोत. वास्तविक जनरल कमिटीच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभिनंदनाचे कोणत्याही प्रकाराचे फ्लेक्स बोर्ड लावता येणार नाहीत, असा ठराव झाला आहे. तरी सदर फ्लेक्स बोर्ड अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे कराड शहर अध्यक्ष उमेश आनंदराव शिंदे व नगराध्यक्षा यांनी लावले आहेत. त्याची परवानगी नाही. याबाबत उमेश शिंदे यांनाही खुलासा करण्याबाबत मुख्याधिकाऱयांनी नोटीस दिली आहे. अभिनंदनाचे फ्लेक्स न लावण्याचा ठराव जानेवारीत सर्वांच्या सहमतीने घेतला आहे. त्यावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची स्वाक्षरी आहे. त्याच ठरावाचे अवमूल्यन त्यांनीच केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्मिता हुलवान यांनी केली आहे.
Share