वृत्तसंस्था / काठमांडू
Advertisements
नेपाळच्या निवडणूक आयोगाने मध्यावधी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणूक प्रक्रिया 15 जुलैपासून सुरू होणार आहे. वेळापत्रकानुसार राजकीय पक्षांना 15 ते 30 जुलैदरम्यान निवडणूक आयोगात नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठीचे अर्ज जुलैच्या अखेरीस मंजूर केली जातील आणि 7 ऑगस्ट रोजी नेपाळ गॅझेटमध्ये याची माहिती प्रकाशित होईल.
नेपाळमध्ये मध्यावधी निवडणूक 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी होणाऱया पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांना 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी अर्ज भरता येणार आहे. दुसऱया टप्प्यासाठी 16-17 ऑक्टोबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे.
निवडणूक आयोगाने ही घोषणा निवडणुकीसंबंधी निर्माण झालेल्या अनिश्चिततेदरम्यान केली आहे. नेपाळी संसदेतील प्रतिनिधिगृह विसर्जित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात किमान 30 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यातील एक याचिका नेपाळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या आघाडीची आहे.
राजकीय संकट
राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी पंतप्रधान केपी शर्मा आली यांच्या शिफारसीवर 22 मे रोजी कनिष्ठ सभागृह विसर्जित केले होते. तसेच 12 आणि 19 नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणूक होणार असल्याची घोषणा केली होती. 5 महिन्यांच्या कालावधीत दुसऱयांदा कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्यात आले होते. नेपाळच्या 275 सदस्यीय संसदेत पंतप्रधान ओली यांना बहुमत प्राप्त नाही. ओली हे सध्या अल्पमतातील सरकार चालवत आहेत.
Share