July 4, 2021
13
गिरीश चोडणकर यांची मुबंई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला पत्राद्वारे विनंती
प्रतिनिधी/ पणजी
Advertisements
काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात विलिन झालेल्या 10 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी गिरीश चोडणकर यांनी सादर केलेली याचिका सभापती राजेश पाटणेकर यांनी फेटाळल्यानंतर सभापतींच्या निवाडय़ाला आव्हान देणाऱया याचिकेवर सलग सुनावणी घेण्यात यावी व त्यासाठी खास खंडपीठाची नियुक्ती करावी, अशी विनंती गिरीश चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून केली आहे.
सभापतींच्या निवाडय़ाला आव्हान देणारी याचिका गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणीस आली होती, त्यावेळी न्यायमूर्ती महेश सोनक यांनी सदर याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या याचिकेत ज्या 10 आमदारांना प्रतिवादी बनविण्यात आले आहेत, त्यातील काहीजण यापूर्वी आपले अशील होते, त्यामुळे सदर याचिकेवर सुनावणी घेणे गैर असल्याने सदर याचिका आपल्यासमोर सुनावणीस नको, असे न्या. सोनक यांनी स्पष्ट केले.
न्यायपीठाने सदर निवाडा दिल्यानंतर न्या. सोनक यांचा समावेश नसलेले वेगळे न्यायपीठ स्थापन करून सदर याचिका या न्यायपीठासमोर सुनावणीस ठेवली जाणार आहे. पण महिना उलटत असला आला तरी अजून वेगळे द्विसदस्य खंडपीठ स्थापन झाले नसल्याने आता याचिकादार यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले आहे.
फक्त 6 महिने बाकी
विधानसभेत कार्यकाळ संपण्यास केवळ 6 महिने बाकी राहिले आहेत. या कालावधीत आव्हान याचिकेवर अंतिम निवाडा घेण्याची अपेक्षा केली जात आहे. कालावधी संपण्यापूर्वी हे 10 आमदार आमदारकीचा राजीनामा देऊन परत पक्षांतर करण्याची शक्यता आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यास अपात्र ठरविण्याचा प्रश्न मिटेल.
…तर 6 वर्षांसाठी अपात्र होऊ शकतात
उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून या 10 आमदारांना अपात्र ठरविल्यास हे हे आमदार 6 वर्षांसाठी अपात्र होऊ शकतात आणि जर ते अपात्र ठरले तर येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे सभापतींनी दिलेल्या निवाडय़ाला आव्हान देणाऱया याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी पूर्ण होणे, आवश्यक असल्याचे गिरीश चोडणकर यांचे म्हणणे आहे.
खास खंडपीठाची मागणी
याचिकादार गिरीश चोडणकर यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिताना सदर आव्हान याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी खास खंडपीठाची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खास खंडपीठ स्थापन झाल्यास दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता चोडणकर यांनी व्यक्त केली.
खास खंडपीठ मुंबईत नको
गोव्यात द्विसदसीय न्यायपीठ फक्त एकच आहे व न्या.महेश सोनक त्याचे एक सदस्य आहेत. मुंबईत एका पेक्षा अधिक न्यायपीठ असल्याने सदर याचिका सुनावणीसाठी मुंबईत पाठवली जाऊ शकते, पण सदर याचिकेवर सुनावणी मुंबईत नको तर गोव्यातच व्हायला हवी, त्यामुळे गोव्यातच खास न्यायपीठ स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुढील आठवडय़ात स्थापनेची शक्यता
गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयातील येत्या आठवडय़ातील सुनावणीची सूची जाहीर झाली आहे. त्याप्रमाणे सोमवार दि. 5 जुलै व गुरुवार दि. 8 जुलै 2021 रोजी न्या. महेश सोनक व न्या. श्रीमती एम. एस. जवळकर यांचे द्विसदसीय न्यायपीठ भरणार आहे. मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस एक सदसीय न्यायपीठ भरते, त्या दिवशी अपात्रतेवरील याचिका सुनावणीस घेण्यासाठी द्विसदसीय न्यायपीठ भरवले जाऊ शकते. या न्यायपीठाची घोषणा येत्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.
फौजदारी सुनावणी दि. 7 जुलै रोजी
अपात्रता याचिकेवरील सुनावणीवेळी सभापतींच्या न्यायालयासमोर बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी 10 आमदारांविरुद्ध सादर केलेली तक्रार पोलीस अजूनपर्यंत नोंद करून घेत नसल्याने तक्रारदार गिरीश चोडणकर यांनी कनिष्ठ न्यायालयात फोजदारी याचिका सादर केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दि. 7 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
Share
previous post