July 4, 2021
27
धरणफुटीच्या २ जुलैच्या मुहुर्तासाठी लोकार्पणाचा खटाटोप!, अलोरे पुनर्वसन प्रकल्प अर्धवट असतानाही घाई,
मुख्यमंत्र्यांनी किल्ल्या दिलेल्या दहाही घरांत वास्तव्य नाही!
प्रतिनिधी / चिपळूण
Advertisements
तिवरेतील धरणग्रस्तांचे अलोरे येथे पुनर्वसन करण्यात आले. तेथे बांधण्यात आलेल्या 24 घरांपैकी दहा घरांचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते झाले. मात्र कामे अपूर्ण असल्याने आणि त्यातच काही घरांत गळती असल्याने लोकार्पणानंतर एकही कुटुंब रहाण्यास गेलेले नाही. शिवाय दिलेल्या घरांच्या चाव्याही परत घेतल्या गेल्या. त्यामुळे धरणफुटीला 2 वर्षे पूर्ण होत असल्याचा मुहूर्त साधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने घाईघाईने लोकार्पणाचा खटाटोप चालवल्याची टीका सर्वत्र होऊ लागली आहे.
2 जुलै 2019च्या अमावस्येच्या रात्री मुसळधार पावसात तिवरे धरण फुटून मोठी आर्थिक आणि जीवितहानी झाली. दुर्घटनेनंतर बाधितांच्या न्यायासाठी मोठमोठ्या घोषणा, आश्वासने तत्कालिन सत्ताधारी शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी दिली. हे धरण माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या कन्ट्रक्शन कंपनीने बांधलेले असल्याने आणि विधानसभा निवडणूकही जवळ येऊन ठेपलेली असल्याने साहजिकच विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने चौफेर टीका करत शिवसेनेला लक्ष्य केले. मात्र धरणफुटी आणि निवडणुकीनंतर सत्तेत बसलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने या संपूर्ण प्रकरणावर चकार शब्दही काढला नाही. एवढेच नव्हे तर एसआयटीचा चौकशी समितीच्या अहवालाचे काय झाले हेही कधी विचारले नाही.
गेल्या दोन वर्षांपासून बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी गावातच कंटेनर केबिनचा पर्याय निवडण्यात आला. दहा कुटुंबांचा संसार या कंटेनर केबिनमध्येच होता. दोन वर्षात या धरणग्रस्तांसाठी अपेक्षित काही करता न आल्याने आणि त्यातच पुनर्वसनही न झाल्याने शिवसेनेने लोकार्पण सोहळा घरांची कामे अपूर्ण असतानाही घाईगडबडीत आयोजित केला. मात्र आता तोच त्यांच्या अंगलट आला आहे.
मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टने पाच कोटीचा निधी दिल्यानंतर बांधकाम विभागाने 3 कोटी 80 लाख रुपये खर्चाच्या दोन निविदा काढल्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते आणि खेर्डीचे माजी सरंपच दशरथ दाभोळकर यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने या निविदा भरून ही 24 घरे उभारली. एकाचवेळी सर्व घरांचे लोकार्पण करावे असे बाधितांचे म्हणणे होते. शिवाय पावसाळा असल्याने साहित्याची हलवाहलव आणि अपूर्ण कामे लक्षात घेता दिवाळीत घरांचा ताबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र शिवसेना नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत लोकार्पण 2 जुलैलाच करण्याचा घाट घालून तो अंमलातही आणला.
मुळातच निविदा प्रक्रियेनंतर डिसेंबरमध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली. जानेवारीत कामाला सुरूवात झाली आणि सहा महिन्यांत घरे उभारली. बांधकाम विभागाने दिलेल्या मुदतीनुसार सप्टेंबरपर्यंत घरे उभारण्याची मुदत होती. मात्र लोकार्पणाची घाई लागल्याने गेल्या दोन महिन्यांत तर जलदगतीने कामे करण्यात आली. शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलेल्या दहापैकी दोन घरांमध्ये गळती लागल्याचे दिसल्यानंतर एका वृध्देने संताप व्यक्त केला. दहापैकी एकाही घरात आतील रंगकाम झालेले नाही. लोकार्पणासाठी केवळ बाहेरून रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे घरांची कामे अपूर्ण असतानाही घाईगडबडीत उरकलेल्या या लोकार्पणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
फीत कापली अन् चाव्या घेतल्या परत…
डीबीजे महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे घरांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी घरे मिळणारे बाधित हजर होते. त्यानंतर मंत्री, खासदार, आमदार आणि अधिकारीवर्ग असा सर्व लवाजमा पुन्हा अलोरे येथील पुनर्वसन प्रकल्पस्थळी गेला. तेथे तीन घरांचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रत्येकाला दिल्या गेलेल्या घरांच्या चाव्या परत घेण्यात आल्या. आठ दिवसांत तुम्ही कधीही या, घरे साफसफाई करून तुमच्या ताब्यात देऊ असे सांगण्यात आले. त्यामुळे बाधितांचा घरे मिळाल्याचा आनंद क्षणभंगूरच ठरला.
..