प्रतिनिधी/ कराड
गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राची परंपरा असलेली पारी वारी रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी, अशी प्रशासनाकडे मागणी करत वारी करणारच अशी भुमिका बंडातात्या कराडकर व वारकऱयांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी सकाळी पुणे जिह्यातील आळंदी येथून बंडातात्यांसह वारकऱयांनी पायी वारीला सुरुवात केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. दरम्यान शनिवारी सकाळी पुणे पोलिसांनी आळंदी येथील तापेकरवाडी येथून बंडातात्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना कराडला आणत करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रामध्ये स्थानबद्ध केले. त्यांच्या भोवती पोलिसांचा खडा पहारा असून आषाढी पायी वारीला शासनाने केलेला विरोध महागात पडेल, असा इशारा बंडातात्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
Advertisements
लाखोंची पायी वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी वारीची परंपरा खंडित झाली. यंदाही कोरोनाचे संकट असून राज्यशासनाने तिसऱया लाटेची शक्यता वर्तवत तयारी सुरू केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे असे सांगत राज्य शासनाने पंढरपूर पायी वारीला सलग दुसऱया वर्षी परवानगी नाकारली. मात्र पंढरपूरला आषाढी पायी वारी काढणारच, असा आग्रह ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचा होता. पायी वारी काढण्यासाठी ते शुक्रवारी आळंदी येथे पोहोचले. पोलीस प्रशासनाला याची कुणकुण लागली होती. पोलिसांनी त्यांना पायी वारी काढण्यास विरोध दर्शविल्यानंतरही बंडातात्या कराडकर आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आळंदीजवळील तापेकरवाडी येथून त्यांना ताब्यात घेतले. दुपारी बाराच्या सुमारास त्यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रमध्ये आणले. कराडचे पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गोरड यांच्यासह पोलीस तेथे उपस्थित होते. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
पत्रकारांशी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले, आषाढी पायी वारी व्हावी यासाठी आमचा आग्रह होता. याच मागणीसाठी चार दिवसांपासून आमचे शांतता व संयमाच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. परंतु पोलिसांनी वारकऱयांचे हे आंदोलन आपल्या खाक्याप्रमाणे मोडीत काढण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी आहे. पोलिसांनी पांडुरंग बुवा घुले आणि मला स्थानबद्ध केले आहे. आषाढी वारी, चाललेले वातावरण व कोरोनाचा विचार करता समाजाला त्रास होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. वारकऱयांचे आक्रमक आंदोलन न करता पोलिसांचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. समस्त वारकऱयांचा विचार करून आम्ही सध्या वारकऱयांना शांततेचे आवाहन करत आहे. वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून सांगतो, की ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या पायी वारीला विरोध करणे शासनाला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
पांडुरंग बघून घेईल – बंडातात्या
शासनाने जे केले ते योग्य केले नाही. देव झोपलेला नाही. पांडुरंग सर्व बघून घेईल, असे म्हणत बंडातात्या कराडकर यांनी पोलिसांना आमचे पूर्णपणे सहकार्य राहील, असे सांगितले. पोलिस प्रशासनाला त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. माझी भूमिका समजून न घेता ही कारवाई करण्यात आली याची खंत आहे. माझ्या आक्रमक वागण्याने पोलीस खात्याला खाली मान घालावी लागेल असे काही होऊ नये याची काळजी मी घेईन. पांडुरंग आहे. तो बघतोय सगळे असे बंडातात्या यांनी सांगितले.
Share