July 3, 2021
11
फेडरर, मेदवेदेव्ह, किर्गीओस, सिलिक, केर्बर, कोको गॉफ तिसऱया फेरीत, स्टीफेन्स, व्हेस्निना, डिमिट्रोव्ह, गॅस्केट, पराभूत
विम्बल्डन
Advertisements
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस, पोलंडची इगा स्वायटेक, झेकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा, अमेरिकेची कोको गॉफ, साबालेन्का, सॅम्सोनोव्हा, जर्मनीची अँजेलिक केर्बर यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला तर रिचर्ड गॅस्केट, बेगू, एलेना व्हेस्निना, स्लोअन स्टीफेन्स, डिमिट्रोव्ह यांचे आव्हान समाप्त झाले.
रॉजर फेडररने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटचा 7-6 (7-1), 6-1, 6-4 असा पराभव करून या स्पर्धेची तिसरी फेरी गाठणारा 46 वर्षांनंतरचा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. पुढील महिन्यात फेडरर 41 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. यापूर्वी 1975 मध्ये 40 वर्षीय केन रोजवालने या स्पर्धेची चौथी फेरी गाठली होती. गॅस्केटविरुद्ध सलग अकरावा विजय मिळविला आहे. या दोघांत आतापर्यंत 21 लढती झाल्या असून त्यापैकी 19 वेळा फेडरर विजयी झाला आहे. तसेच ग्रँडस्लॅममधील सर्व पाचही सामन्यांत फेडररने गॅस्केटला हरविले आहे. विम्बल्डनचे नववे व कारकिर्दीतील 21 वे विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी तो प्रयत्न करीत आहेत. द्वितीय मानांकित रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हनेही तिसरी फेरी गाठली असून त्याने स्पेनच्या 18 वर्षीय कार्लोस अल्काराझचा 6-4, 6-1, 6-2 असा पराभव केला. त्याची पुढील लढत मारिन सिलिकशी होईल. सिलिकने पात्रता फेरीतून आलेल्या बेंजामिन बॉन्झीचा 6-4, 3-6, 6-3, 7-6 (7-5) असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या किर्गीओसने आगेकूच कायम ठेवताना इटलीच्या जियानलुका मॅगरवर 7-6 (9-7), 6-4, 6-4 अशी मात केली. या सामन्यात त्याने 29 बिनतोड सर्व्हिस केल्या. अन्य एका सामन्यात टेलर फ्रिट्झने स्टीव्ह जॉन्सनचा पाच सेट्सच्या झुंजीत पराभव केला तर अलेक्झांडर बुबलिकने 18 व्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हचे आव्हान 6-4, 7-6 (8-6), 7-6 (7-4) तसेच पेड्रो मार्टिनेझने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सचे आव्हान चार सेट्समध्ये संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली.
सॅम्सोनोव्हाचा स्टीफेन्सला धक्का
महिला एकेरीत माजी प्रेंच विजेत्या सातव्या मानांकित इगा स्वायटेकने चौथ्या फेरीत स्थान मिळविताना रोमानियाच्या इरिना कॅमेलिया बेगूचा 6-1, 6-0 असा धुव्वा उडविला. स्वायटेकने या स्पर्धेत उतरण्याआधी ग्रास कोर्टवर फक्त एक सामना खेळला होता. तरीही तिने प्रतिस्पर्ध्यावर सहज मात केली. आठव्या मानांकित झेकच्या प्लिस्कोव्हानेही शेवटच्या सोळामध्ये स्थान मिळविताना आपल्याच देशाच्या टेरेझा मार्टिनकोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेआधी झालेल्या बर्लिन व ईस्टबोर्न स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र येथील स्पर्धेत सहजतेने खेळताना तिने अद्याप एकही सेट गमविलेला नाही. तिची पुढील लढत लुडमिला सॅम्सोनोव्हाशी होईल. लुडमिलाने अमेरिकेच्या स्लोअन स्टीफेन्सला पराभवाचा धक्का देत 6-2, 2-6, 6-4 असा विजय मिळवित चौथी फेरी गाठली. अन्य सामन्यात दुसऱया मानांकित साबालेन्काने मारिया सेरॅनोचा 6-0, 6-3, रीबाकिनाने शेल्बी रॉजर्सचा 6-1, 6-4 असा पराभव करीत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले.
केर्बरचा विजयासाठी संघर्ष
तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविलेल्या जर्मनीच्या केर्बरला तिसरी फेरी गाठताना संघर्ष करावा लागला. स्पेनच्या सारा सोरिबेस टॉर्मोने तिला कडवा प्रतिकार केला. मात्र केर्बरने अखेर 7-5, 5-7, 6-4 असा विजय मिळवित आगेकूच केली. केर्बरला येथे 25 वे मानांकन मिळाले असून विजयासाठी तिला सव्वातीन तास झुंजावे लागले. अमेरिकेची 20 वी मानांकित युवा टेनिसपटू 17 वर्षीय कोको गॉफनेही तिसऱया फेरीत स्थान मिळविले. तिने रशियाच्या एलेना व्हेस्निनाचा 6-4, 6-3 असा पराभव केला.
अंकिता रैनाचे महिला दुहेरीतील आव्हान समाप्त
भारताच्या अंकिता रैनाने विम्बल्डनच्या प्रमुख ड्रॉमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळविले होते. पण तिचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिससमवेत महिला दुहेरीत खेळताना तिला अमेरिकेच्या चौदाव्या मानांकित आसिया मुहम्मद व जेसिका पेगुला यांच्याकडून 6-3, 6-2 असा केवळ 70 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. अंकिता आता मिश्र दुहेरीत रामकुमार रामनाथनसमवेत खेळणार आहे. त्यांची लढत आपल्याच देशाच्या सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा या जोडीशी होणार आहे.
Share
previous post
next post