comparemela.com


मुंबई / राजापूर / सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने रविवार रात्रीपासून मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात तुफान बॅटिंग सुरू केली आहे. धुवांधार आणि सतत कोसळणाऱ्या पावसाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. त्यामुळे कोकणातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले आहे. राजापूर शहर जलमय झाले असून पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना बोटीतून बाहेर काढले जात आहे.
राजापुरातील कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून एक अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. कोदवली नदीला पूर आल्याने राजापुरात बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अर्जुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या २४ तासांत सरासरी ११५ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक १५३ मिमी पाऊस राजापुरात पडला आहे. रत्नागिरी ७२ मिमी, चिपळूण १२३ मिमी, लांजा १२३ मिमी, मंडणगड १३७ मिमी, खेड ११८ मिमी, दापोली ७९ मिमी, गुहागर १३२ मिमी आणि संगमेश्वर १०२ मिमी पाऊस पडला आहे. रविवारपासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला असून राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. तर, अमरावती, नांदेड जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. खारेपाटण येथे पूरपरिस्थिती मुळे शुकनदीच्या पात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले आहे. यामुळे खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून खारेपाटण बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगरकडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याच्या खाली गेला आहे. येथील वस्तीचा यामुळे संपर्क तुटला आहे. तर खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याचा वेढले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्णत: बुडाला आहे.
रविवार सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसाने सायंकाळनंतर चांगलाच जोर धरल्याने राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले आहे. या पुराच्या पाण्यातून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान कोंढेतड पुलानजीक सुमारे ३५ ते ४० वयाची एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली. या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, गेले दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीकिनाऱ्यावर असणारे व्यापारी व येथील नागरिक सतर्क झाले होते. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात राजापूर शहराला दुसऱ्यांदा पुराचा वेढा पडला आहे. अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाला वेढा देत थेट शिवस्मारकाच्या पुढे पार कुशे मेडिकल पर्यंत मारली असून शहर बाजारपेठेत पाणी शिरले आहे. जवाहर चौक, बंदरधक्का, मुन्शीनाका, वरचीपेठ कोंढेतड रस्ता व परिसर पाण्याखाली गेला असून राजापूर-चिखलगाव रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरिल वाहतूक बंद करण्यात आली आहे. शीळ येथे जयकुमार बिर्जे व विश्वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मध्यरात्री १ वाजता ही घटना घडली आहे.
ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असून नदी – नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. राजापूर ओणी, पाचल मार्गावर सौंदळ रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने मध्यरात्रीच अर्जुना व कोदवली नद्यांच्या पुराच्या पाण्याने शहराला वेढा दिला. सोमवारी सकाळी जवाहर चौकासह बाजारपेठेत पाणी शिरले, पुराच्या पाण्याने थेट शिवस्मारकापर्यंत धडक मारली. तर अर्जुना आणि कोदवली या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला.
राजापूर शहर बाजारपेठेत अनेकांच्या दुकानात सोमवारी सकाळी पुराचे पाणी शिरले होते. जवाहर चौकात पाणी आल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली होती. ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने व नदी नाल्यांना पूर आल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. नदीकिनाऱ्यालगत असलेल्या व नुकत्याच लावलेल्या भातशेतीला या पावसाचा आणि पुराचा फटका बसला आहे. राजापूर शहरात पुराचे पाणी शिरल्याचे कळताच व दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचे कळताच राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी पूर परिस्थितीची पहाणी केली. तर वरचीपेठ येथी ब्रिटीशकालीन पुलाचीही पहाणी केली. याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष बाकाळकर व राजापूर तलाठी संदीप कोकरे व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्गात आजपासून ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार १३ ते शुक्रवार १६ जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, मोबाईलचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
अर्जुनेच्या पाण्यात एक वाहून गेला
जोरदार पडणाऱ्या पावसामुळे सोमवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान अर्जुना नदीच्या पुराच्या पाण्यात एक ३५ ते ४० वर्षींय प्रौढ वाहून गेला आहे. याबाबतची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे. कोंढेतड पुलानजीक ही घटना घडली आहे. कोंढेतडकडून पुलावरून राजापूर शहराकडे येणारा हा इसम पुलावरून खाली उतरला. मात्र तेवढ्यात पाण्याचा लोंढा आला व त्यातून तो वाहून गेला. या ठिकाणी पुराचे पाणी पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेने तो वाहून जाताना पाहिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राजापुरात होडीने वाहतूक
राजापूर नगर परिषदेकडून नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी फायबर बोटची मागणी केली होती. ती बोट जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून दिली होती. सोमवारी ही बोट वाहतुकीसाठी वापरण्यात आली. जवाहर चौकातून पलीकडे ये-जा करण्यासाठी या बोटीचा वापर करण्यात आला.
भातशेती पाण्याखाली…
दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात नदी – नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. राजापूर तालुक्यात शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, आंगले, दोनिवडे, उन्हाळे, कोदवली, खरवते, ओणी, सौंदळ, पाचल, रायपाटण, येळवण, तळवडे व पूर्वभागात अनेक गावांतील तसेच गोवळ, शिवणे, तारळ, उपळे, प्रिंदावण या परिसरात मोठ्या प्रमाणावर भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.
रायगडमध्ये पूल गेला वाहून, चालकाचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला असून, सरासरी ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे काशिद येथे पूल वाहून गेला असून, या दुर्घटनेत एक वाहन चालक वाहून गेला आहे. त्याचबरोबर राजपुरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर उसरोली नदीलाही पूर आल्याने सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुर्घटनेत एकदरा येथील विजय चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जणांचे जीव थोडक्यात बचावले. रोहा तालुक्यात केळघर रोडवर कळवटे आदिवासी वाडीजवळ दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. राजपुरी येथे एका झोपडीवर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. मुरुडमधील उसरोली नदीला पूर आल्याने पुराचे पाणी आसपासच्या परिसरात शिरले. त्यामुळे सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Related Keywords

Dapoli ,Maharashtra ,India ,Ratnagiri District ,Mumbai ,Ratnagiri ,Orissa ,Khed ,Guhagar ,Mandangad ,Amravati ,Chiplun ,Konkan ,Palghar ,Dev Anand ,Subhashb Rajapur ,Tyre Rajapur ,Bank Building ,Start Kelly ,Ratnagiri District Red ,Ratnagiri District Start ,Sunday Districtb Ratnagiri District ,Nanded District ,District Central ,Market Shirley ,Congress County President Subhashb Rajapur ,District ,Friday July ,Bridge Rajapur ,Transport Rajapur ,டைப்போலி ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,ரதணகிரி மாவட்டம் ,மும்பை ,ரதணகிரி ,ஓரிஸ்ஸ ,கேட் ,குஹாகர் ,மண்டங்கட் ,அமராவதி ,சிப்ளன் ,கொங்கன் ,பல்காற் ,தேவ் ஆனந்த் ,வங்கி கட்டிடம் ,நன்தேத் மாவட்டம் ,மாவட்டம் மைய ,மாவட்டம் ,வெள்ளி ஜூலை ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.