comparemela.com


राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार दररोज कोणत्या ना कोणत्या तरी, चौकशीच्या फेऱ्यात अडकत आहे. समोरून एकेक नावे पुढे येत आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपला फारसे काही करावेच लागत नाही. महाविकास आघाडीतील मंत्री तपास यंत्रणेच्या जाळ्यात अलगदपणे अडकत आहेत. माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यापासून सुरुवात झाली आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे एकापाठोपाठ एक ईडीकडून न्यायालयासमोर येतच आहेत. त्यात परिवहन मंत्री अनिल परब आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देखील तपासयंत्रणेकडून बोलावले जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री यांना पत्र पाठवून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अँटिलिया स्फोटके तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने चौकशीदरम्यान अजित पवार आणि अनिल परब यांचा उल्लेख केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी याच सचिन वाझेची वकिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेनेचे नेते करीत होते. सचिन वाझे आणि शिवसेनेचे कनेक्शन तर पूर्वीपासूनचेच आहे. भाजपबरोबर सत्तेत असताना शिवसेनेने याच वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ घातली होती. पण फडणवीस यांनी तेव्हा त्याला दाद दिली नाही.
याच वाझेच्या चौकशीत नवनवीन खुलासे होत आहेत. अजित पवार यांनी दर्शन घोडावतच्या मार्फत अवैध गुटखा विक्रेत्यांकडून आणि उत्पादकांकडून बेकायदेशीरपणे १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असे वाझेने म्हटले आहे, तर अनिल परब यांनीही वाझेला मुंबई महापालिकेच्या ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले, तर सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट विरोधात चौकशी करण्याच्या निमित्ताने त्यांना त्रास देऊन ५० कोटी जमा करण्यास सांगितले होते, असे वाझेने चौकशीदरम्यान सांगितले. त्या आधारे भाजप कार्यकारिणीत त्यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव करण्यात आला आणि चंद्रकांत पाटील यांनी तसे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले.
त्यापाठोपाठ गुरुवारी ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात असलेल्या सातारा जिल्ह्यातील ‘जरंडेश्वर शुगर्स’ या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. २०१०मध्ये जरंडेश्वर सहकारी कारखान्याचा लिलाव झाला, तेव्हा निर्धारित किमतीपेक्षा कमी दराने हा कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. यानुसारच ही कारवाई करण्यात आली. ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने हा कारखाना खरेदी करून लगेचच जरंडेश्वर शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला होता. या कंपनीत ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा मोठा हिस्सा असून ही कंपनी अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, राज्यासह देशभरात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातही अजित पवार यांचे नाव होते. पण २०१९मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शपथपत्र दाखल करून अजित पवार यांना क्लीनचिट दिली. त्याला भाजपने त्यावेळी आक्षेपही घेतला. त्याचबरोबर त्यांचे नाव शिखर बँकेच्या साखर कारखाना लिलाव घोटाळ्यातही आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची काही साखर कारखान्यांनी परतफेड केली नव्हती. अशा थकबाकीदार साखर कारखान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अत्यल्प दरात या कारखान्यांची विक्री केली गेली. बँकेवर संचालकपदी असलेल्या नेत्यांच्या नातेवाइकांनी यातले काही कारखाने विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फडणवीस सरकारच्या काळात सत्तेत सहभागी असली, तरी भाजपच्या नियंत्रणामुळे शिवसेनेला फारसे डोके वर काढता आले नाही. आता तर, शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. या दोन्ही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. तेही आता पाच वर्षांनंतर सत्तेवर आले आहेत. त्यामुळे अशी समोर येणारी प्रकरणे सत्तेपासून दूर राहिल्याने वाढलेली भूक दर्शवते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महाविकास आघाडी सरकारमधील दिग्गज केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर येत असताना या आघाडीतील प्रमुख नेते मात्र कानावर हात ठेवत आहेत. मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा ठपकाही ठेवला जात आहे. महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी अशा चौकशा लावल्या जात असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांनी अलीकडेच म्हटले आहे. पण प्रश्न असा आहे की, तिथे काही तरी पाणी मुरले आहे, म्हणून तर चौकशी केली जात आहे ना? जिथे आग असते तेथूनच धूर येतो. म्हणून तर हा चौकशीचा प्रपंच. हात स्वच्छ असतील, तर तपास यंत्रणा तपास करतीलच कशाला?

Related Keywords

Satara District ,Maharashtra ,India ,Shiv ,Rajasthan ,Mumbai ,Ajit Pawar ,Sanjay Rathore ,Chandrakant Patil ,Sharad Pawar , ,Distribution Thackeray ,Forests Sanjay Rathore ,Home Anil Deshmukh ,Minister Anil Parab ,Minister Nitin Rout ,Central Home ,Transport Anil Parab ,Anil Parab ,Shiv Sena ,Thursday Maharashtra State ,Maharashtra State ,Bank Director ,Government Central ,சதாரா மாவட்டம் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,ஷிவ் ,ராஜஸ்தான் ,மும்பை ,அஜித் பவார் ,சஞ்சய் ரதோரே ,சந்திரகாந்த் பாட்டீல் ,ஷரத் பவார் ,வீடு அனில் தேஷ்முக்ஹ் ,அமைச்சர் அனில் பராப் ,மைய வீடு ,போக்குவரத்து அனில் பராப் ,அனில் பராப் ,ஷிவ் சேனா ,மகாராஷ்டிரா நிலை ,வங்கி இயக்குனர் ,அரசு மைய ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.