comparemela.com


लॉकडाऊनच्या निमित्ताने एसटी म्हणजे लालपरीतून प्रवास करण्याची संधी मुंबईकरांना लाभली. मात्र, ही सेवा आता खंडित झाली आहे. एसटीच्या चालक-वाहकांच्या आरोग्याचा विचार करत एसटीच्या वर्धापनदिनी बेस्टच्या सेवेतून सर्व बसेस बंद करीत असल्याची घोषणा एसटी महामंडळाने केली. संपूर्ण राज्यभरात एसटी महामंडळाची सेवा आहे. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी हे उद्दिष्ट ठेऊन प्रत्येक गावामध्ये एसटी धावत आहे. कोकणात रेल्वे पोहोचली. वेगवान प्रवास झाला तरी तुमच्या घरापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे रेल्वेने गेल्यानंतरही अनेक चाकरमान्यांना आजही एसटीची मदत घ्यावी लागले. राज्यातील पहिली सरकारी सेवा म्हणून एसटीने नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. कुठलेही संकट असो किंवा राज्यव्यापी यात्रा, जत्रा, मेळावा. एसटी नेहमीच मदतीला धावून आली आहे.
गेली दीड वर्षे कोरोनाने देशभरात कहर माजवला आहे. पहिली लाट गेली. दुसरी लाट अंतिम टप्प्यात आहे. आणखी लाटा नको. पण तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या लाटेनंतर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. बाधितांची संख्या कमी करण्यासाठी रेल्वेसेवा बंद करण्यात आली. त्याचा सर्वाधिक फटका मुंबईकरांना बसला. मुंबईची लाइफलाइन बंद झाली. पहिली लाट ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असताना बेस्ट बसवरील ताण वाढला. त्यानंतर कोरोना काळात बेस्टच्या परिवहन उपक्रमातील सुमारे तीन हजार बस ताफ्यांच्या जोडीला एसटी महामंडळाकडून एक हजार बसचा ताफा सेवेत होता. कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गासमोर बेस्ट वा अन्य वाहतुकीचाच पर्याय उपलब्ध होता; परंतु या काळात बेस्टवरही मोठ्या प्रमाणावर भार पडत होता, तर दुसरीकडे अनेक कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण होत होती. त्यामुळेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी एसटीचे कर्मचारी धावून आले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईकरांची सेवा करत होते.
मुंबईकरांच्या सेवेसाठी राज्यातील विविध आगारांतील हजारो एसटी चालक व वाहक मदतीला धावून आले होते. मुंबईतील रस्त्यांची माहिती नसतानाही त्यांनी अगदी कौशल्यपूर्ण कर्तव्य पार पाडले. मुंबई ठाऊक नसलेल्या एसटीच्या चालक आणि वाहकांना सुरुवातीला रस्ते, वाहतूक तसेच येथील प्रवाशांशी जुळवून घेणे कठीण झाले. काही जणांनी त्यांना सहकार्य केले, तर काहींनी त्यांचा गैरफायदा घेतला. काही महिन्यांनंतर येथील वातावरणाशी रुळले. मात्र, एका आठवड्याच्या मुंबई भेटीनंतर काही तरी नवे शिकल्याचा आनंद ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसायचा. परगावातून मुंबईत येत येथील परिस्थितीशी जुळवून घेत वेळप्रसंगी अडी-अडचणींवर मात करत मुंबईकरांसाठी सेवा देणाऱ्या चालक, वाहक व व्यवस्थेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे परिवहन मंत्र्यांनी आभार मानले. तुमच्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळेच एसटीचा मान व विश्वास वाढतो, असे कौतुकौद्गारही त्यांनी काढले. एसटी कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. मात्र, परिवहनमंत्र्यांनी त्यांची योग्य व्यवस्था ठेवली नाही, हेही नमूद करावे लागेल. पश्चिम उपनगरातील एसटी कर्मचाऱ्यांचे वास्तव्य अंधेरी येथे होते. मात्र, सेकंड शिप्ट असेल आणि मालवणीसारख्या डेपोमध्ये कार्यरत असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मध्यरात्री दीड-दोन वाजायचे. त्यानंतर जेवण आणि झोपणे. अशा अनेक समस्या असूनही प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत.
एसटीची सेवा संपुष्टात आल्याने बेस्टवर प्रवाशांचा भार पडणार आहे. बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बसेस आहेत. त्यापैकी २,६०० बसेस सध्या धावत आहेत. बेस्टकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १,५०० बस चालविल्या जात आहेत. मुंबई अद्याप पूर्णपणे अनलॉक झालेली नाही. त्यामुळे बेस्टचा प्रवास अद्याप तरी सुसह्य आहे; परंतु मुंबई शहरातील निर्बंध हळूहळू उठवल्यास प्रवाशांची गर्दी वाढेल. त्यावेळी लोकल सुरू करण्याशिवाय अन्य पर्याय नसेल. मुंबईकरांच्या सेवेत आता बेस्टमार्फत चालवल्या जाणाऱ्या वातानुकुलित मिनी बसेस आहेत. भाडेतत्त्वावरील या बसेस या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. या मिनी बसेसमध्ये सीसीटीव्हीही लावण्यात आले आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी या मिनी बसेस उपयोगी पडतात. सध्या शंभरहून अधिक मिनी बसेस मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत. मिनी बसेस शॉर्ट रूटसाठी ठीक आहेत. मात्र, लांब अंतरासाठी मोठ्या बसेस हव्यात; परंतु मिनी बसेस आल्यानंतर बेस्टने अनेक जुन्या गाड्या भंगारात काढल्या. परिणामी, अनेक लांब अंतरासाठी मिनी बसेसची सेवा आहे. या बसमध्ये मोठ्या बसच्या तुलनेत निम्या प्रवासांची भिस्त आहे. सर्वांसाठी लोकल अद्याप सुरू न झाल्याने बेस्ट पूर्ण क्षमतेने सुरू राहावी. तसेच बसेस वेळेत धावाव्या, एवढीच तमाम मुंबईकरांची इच्छा आहे.

Related Keywords

Konkan ,Maharashtra ,India ,Mumbai ,Rome ,Lazio ,Italy ,Andheri , ,St Corporation Office ,Mumbai Office ,Rst Corporation ,Std Kelly Mumbai Office ,Corporation Kelly ,Indian Railways ,Konkan Railways ,Mumbai Sat ,Mumbai Lifeline ,Mumbai Roads ,Mumbai Transport ,கொங்கன் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,மும்பை ,ரோம் ,லேஸியோ ,இத்தாலி ,அந்தேரி ,மும்பை அலுவலகம் ,ஸ்டம்ப் நிறுவனம் ,இந்தியன் ரயில்வே ,கொங்கன் ரயில்வே ,மும்பை சாலைகள் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.