मुंबईसह 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
Updated: Jul 13, 2021, 07:54 AM IST
मुंबई : मुंबईत 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसासंदर्भातली एक मोठी बातमी हवामान खात्याने दिली आहे. (Monsoon Update : Heavy Rain alert in Mumbai, Raigad, Ratnagiri Red Alert )
हवामान खात्यानं मुंबईसह 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, घराबाहेर पडू नये असं आवाहनही करण्यात आलंय. महाराष्ट्रात 4-5 दिवसात चांगला पाऊस होणारंय. मुंबईत आज यलो अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरीत आज रेड अलर्ट असेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.
मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमधल्या गुहागर तालुक्यातील पडवे गावात चार म्हशी वाहून गेल्या. यापैकी तीन म्हशींना गंभीर अवस्थेत वाचवण्यात यश आलं. चरण्यासाठी त्यांना काताळे नवानगर परिसरात नेण्यात आलं. परतताना पावसाचा जोर वाढला. त्यामुळे ओढ्याला पूर आला. त्यात या चार म्हशी वाहून गेल्या.
मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यामधलं केळवली गाव जलमय झालं. अशात महावितरणचे कर्मचारी रूपेश महाडिक पाण्यातून वाट काढत विजेच्या खांबाकडे गेले. तिथे तांत्रिक काम पूर्ण करून ते छातीभर पाण्यातूनच माघारी आले.
राजापुरातल्या जवाहर चौकात 15 ते 20 फुट इतकं पाणी होतं.. दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानदारांची तारांबळ उडाली. शिवाय, नागरिकांनी देखील सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. दरवर्षी पाणी घरात शिरून नुकसान होतं, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
Tags: