अग्रलेख:‘रोम’हर्षक!
13 तासांपूर्वी
कॉपी लिंक
जगभरातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमींना जी जिद्द अन् चुरस, जो संघर्ष नि थरार अनुभवायचा असतो, तो सारा यंदाच्या ‘युरो कप’ने त्यांना दिला. शब्दश: अवघ्या एका पावलावर असलेला इतिहास घडवण्याचा क्षण साकारण्यासाठी यजमान इंग्लंड अन् इटलीचे खेळाडू जीवाचे रान करत हाेते. प्रचंड मेहनतीच्या बळावर इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत आला होता. आजवर कधीही न मिळालेले यश खेचून आणण्यासाठी हॅरी केनच्या नेतृत्वातील या संघाने कंबर कसली हाेती. वेम्बले स्टेडियमवर यजमान संघाचेच माेठ्या संख्येत पाठीराखे. त्यामुळे त्यांचीच बाजू बळकट मानली जायची. त्याचा प्रत्यय फाॅरवर्ड ल्यूक शाॅने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अाणून दिला.
सर्वांत कमी वेळात गाेल करून त्याने संघाच्या विजयाचा दावाही मजबूत केला. मात्र, त्यानंतर इंग्लंडच्या स्वप्नांना धक्का देणारी खेळी करत इटलीने ६७ व्या मिनिटाला बराेबरी साधली. त्यानंतर खरी झुंज रंगात अाली. इटलीने अापला अनुभव पणाला लावून यजमानांचा घरच्या मैदानावर जिंकण्याचे मनसुबे उधळले. पेनल्टी शूट अाउटमध्ये सामना जिंकून तब्बल ५३ वर्षांनंतर युराे कप उंचावण्याचा पराक्रम केला. स्टेडियममध्ये खच्चून गर्दी केलेल्या अन् हा सामना टीव्हीवर पाहणाऱ्या इंग्लंडच्या तमाम चाहत्यांसाठी हा क्षण आणि त्यानंतरची रात्र प्रचंड निराशेची होती.
दुसरीकडे, संपूर्ण इटलीत आणि जगभरातील या देशाच्या चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण आले. रोमलाही आनंदाचे, हर्षोल्हासाचे भरते यावे, असा हा क्षण! खेळात कुणी तरी जिंकतो, कुणी तरी हरतो, हे खरेच. पण, अनेक वेळा पराभवातील शौर्य अन् विजयातील धैर्य हे दोन्ही गुण इतकी उंची गाठतात की तो खेळ पाहणाऱ्याला जय-पराजयाच्या पलीकडचा अलौकिक अनुभव मिळाल्याशिवाय राहत नाही. युरो कपच्या अंतिम सामन्याने कोट्यवधी फुटबॉलप्रेमींना हीच अनुभूती दिली.
बातम्या आणखी आहेत...