महाड, चिपळूणच्या नागरिकांसमोर पूरानंतर आरोग्याचही संकट उभं!
पूरपरिस्थितीचा धोका असताना मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Updated: Jul 23, 2021, 10:43 AM IST
सुरभि जगदीश, झी मीडिया, मुंबई : राज्यात मुसळधार पावसाने हाहाःकार उडवला आहे. मुसळधार पावसाने कोकणातील चिपळूण, महाड, खेड तसंच संगमेश्वर याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये हजारो लोकं अडकल्याची भितीही व्यक्त करण्यात येतेय. पूराचं पाणी कधी ओसरणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.
दरम्यान पूरपरिस्थितीमुळे लोकांच्या घरात पाण्याने शिरकावं केला आहे. यामुळे अनेक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर या पाण्यामुळे बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. तर आता पूरपरिस्थितीचा धोका असताना मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पूराच्या पाण्यामुळे काही रोग तसंच आजार पसरू शकतात.
याबाबत झी 24 तासशी बोलताना अलिबागच्या जिल्हा रूग्णालयातील डॉ. राजीव तांभाळे म्हणाले, "महाडमध्ये मुसळधार पावसाने पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांपुढे रोगराईच्या रूपाने एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस हा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. त्याचप्रमाणे डेंग्यू आणि मलेरियाचा धोकाही नाकारता येत नाही."
डॉ. राजीव पुढे म्हणाले, "सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. मात्र या काळात सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं कठीण आहे. तरीही नागरिकांनी आपापल्या परीने खबरदारी घेणं गरजेचं आहे."
चिपळूणमध्ये 2005 नंतर भीषणपरिस्थिती उद्भवली आहे. वाशिष्ठी, शिव नदीला पूर आला आहे. रत्नागिरीतील डॉक्टर डॉ. रोहन आंबावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, "सध्या चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूराचं पाणी ओसरल्यानंतर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन प्रकारे नागरिकांना त्वचेच्या समस्या तसंच पोटाचे आजार यांचा सामना करावा लागू शकतो. डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, काविळ, जुलाब तसंच उलट्या यांचा सामान्यपणे त्रास जाणवू शकतो."
डॉ. रोहन पुढे म्हणाले, "रोगराई पसरू नये यासाठी नागरिकांनी स्वच्छ आणि उकळलेलं पाणी पिणं फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्वचेसंदर्भात किंवा पोटाबाबत काहीही समस्या आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये."
Tags: