comparemela.com


सुकृत खांडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धसका बसला आहेच, पण शिवसेना द्विधा मन:स्थितीत सापडली आहे. भाजपला दूर सारून आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले; पण शिवसेना वेगाने विस्कळीत होत आहे. पुन्हा भाजपशी जमवून घेण्याची शिवसेनेची इच्छा असावी, पण महाविकास आघाडीच्या चक्रातून बाहेर कसे पडायचे, हा मोठा प्रश्न आहे. भाजपबरोबर पुन्हा जायचे, पण कसे, या विचाराने शिवसेनेला पछाडले आहे.
महाआघाडीचे सरकार राज्यात येऊन दीड वर्षे लोटले, पण शिवसेनेला काय मिळाले? शिवसैनिकांना काय फायदा झाला? किती शिवसैनिक स्वत:च्या पायावर उभे राहिले? किती जणांवरील खटले काढून घेतले, अशी कुजबूज पक्षात चालू आहे. उद्धव हे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षसंघटनेकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. उद्धव हे सरकार चालवत आहेत, पण त्यांनी पक्षसंघटनेची जबाबदारी नेमकी कोणावर सोपवली आहे? पक्षात नेते, उपनेते, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, अशी पदाधिकाऱ्यांची केडर आहे. पण त्यांच्याशी संवाद साधायला कोणी नाही. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आणि पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाला म्हणजे शिवसेनेला राज्यात वैभवाचे दिवस येतील, असे सर्वसामान्य शिवसैनिकांना वाटले होते, पण राज्यात व महापालिकेत सत्ता असूनही जाहिराती जमा करणे आणि फिरून वर्गणी गोळा करायची कामे शिवसैनिकांना करावी लागत आहेत. कोविड काळात शिवसैनिकांना मार्गदर्शन करायला कोणी नाही. लॉकडाऊनमध्ये जनतेला आधार कसा द्यावा? त्यासाठी काय करावे? लोकसंपर्क कसा ठेवावा, हे कोणी सांगायला नाही. उलट भाजपची यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने काम करताना दिसते आहे. भाजपच्या केडरने झोपडपट्ट्या, हौसिंग सोसायट्या आणि चाळीमधेही ऑक्सिमीटरचे वाटप केले. महापालिकेच्या व खासगी इस्पितळातील लस केंद्रांवर सर्वत्र भाजपची यंत्रणा सक्रिय दिसते. स्थानिक पातळीवर लस कुठे मिळणार, कोणाला मिळणार, कुठे मिळणार नाही याची माहिती भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक लोकांना रोज सोशल मीडियावरून देत असतात. लस केंद्रांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना काम वाटून दिलेले आहे. धान्य वाटप असो की मास्क वाटप, सर्वत्र भाजपची केडर दिसते व नेते, पदाधिकारी तेथे उपस्थित दिसतात. मग मंत्रालयात व महापालिकांमध्ये सत्ता असून सेनेची यंत्रणा कुठे असते? एखाद-दुसरा कार्यक्रम केला म्हणजे समाजसेवा केली, असे होत नाही. भाजपची यंत्रणा गेले दीड वर्षे वेळापत्रकानुसार काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मतदारसंघातील नागरिकांची नावे व मोबाईल नंबर यांची अद्ययावत यादी भाजपकडे आहे. आपण कोणाला कुठे कशी मदत केली, याची नोंद कुलाब्यापासून ते मुलुंड-दहिसरपर्यंत भाजपच्या यंत्रणेकडे आहे. अन्य शहरात व राज्याच्या ग्रामीण भागातही हेच चित्र आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिवसेनेचा असून आणि पक्षप्रमुखांचे पुत्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असूनही शिवसेना लॉकडाऊन काळात सुस्तावली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार व प्रदेश भाजप सचिव निलेश राणे, भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ, आशीष शेलार, अतुल भातखळकर, प्रसाद लाड अशी भली मोठी पक्षाची टीम महाआघाडी सरकारवर रोज हल्ले चढवत असते. पण त्याच वेळी पक्षाची केडर शांतपणे समाजसेवेत गुंतलेली दिसते. पक्षाचे प्रमुख नेते महाआघाडीच्या भ्रष्टाचाराचा पुरव्यानिशी बुरखा फाडत आहेत व दुसरीकडे पक्षाचे कार्यकर्ते थेट जनसंपर्क व समाजसेवेत गुंतलेले आहेत. विशेष म्हणजे, भाजपच्या या कार्यकर्त्यांची सर्वतोपरी काळजी पक्ष घेत आहे.
लढाऊ नेते नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपला महाआघाडीच्या विरोधात लढायला मोठे बळ मिळाले आहे. त्याचबरोबर उत्तर भारतीयांचे नेते व माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणे यांना मानणारा मुंबई-कोकणात फार मोठा मराठी वर्ग आहे आणि त्या जोडीला कृपाशंकर सिंह यांच्याकडे उत्तर भारतीयांची मते भाजपकडे खेचण्याचे सामर्थ्य आहे. राणे व कृपाशंकर या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी मोठा जनाधार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत हे दोन्ही नेते शिवसेना व काँग्रेसला जेरीस आणू शकतात.
शिवसेनेला आता हिंदुत्वाचा जप करता येणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व उच्चारले, तरी लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. महाराष्ट्रात कोविड काळात सव्वा लाखांवर कोरोनाने बळी घेतले, ६० लाखांवर लोकांना कोरोनाने घेरले. कधी रुग्णवाहिका नाही, कधी बेड नाही, कधी ऑक्सिजन नाही, तर कधी व्हेंटिलेटर नाही, कधी-कधी स्मशनातही रांगा लागलेल्या, अशा अवस्थेत महाराष्ट्राने दिवस काढले आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असे सांगत ठाकरे सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले. निर्बंधाच्या नावाखाली ठाकरे सरकारने जनतेला वेठीला धरले. सामान्य लोकांना मुंबईच्या लोकलपासून वंचित ठेवले, हजारो-लाखोंचे संसार मोडकळीस आले. लोकांचे अश्रू या सरकारला कधी दिसले नाहीत, लोकांचा आक्रोश या सरकारला कधी ऐकू आला नाही. विधानसभेतील भाजपचे बारा आमदार निलंबित करून भाजपविरोधात फार मोठी लढाई जिंकल्याचा आव ठाकरे सरकार आणत आहे. पण अजेंडा व अहंकाराने धुसफूस वाढल्याने पुढे काय, या चिंतेने महाविकास आघाडीला घेरले आहे.

Related Keywords

Shiv ,Rajasthan ,India ,Mumbai ,Maharashtra ,Nilesh Rane ,Narendra Modi ,Narayan Rane ,Ashish Shelar ,Nitesh Rane ,Branch Head ,Head Of Department ,Shiv Senab Congress Jerry ,Shiv Sena ,Prime Minister Narendra Modi ,Cabinet Maharashtra Front Start Sat ,Distribution Thackeray ,Chief Minister ,General Shiv Sena ,Secretary Nilesh Rane ,Figure Tiger ,North Indians ,Shiv Sena Hinduism ,Station Front ,ஷிவ் ,ராஜஸ்தான் ,இந்தியா ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,நிலேஷ் றானே ,நரேந்திர மோடி ,நாராயண் றானே ,ஆஷிஷ் ஷேலர் ,நீத்தேஷ் றானே ,கிளை தலை ,தலை ஆஃப் துறை ,ஷிவ் சேனா ,ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி ,தலைமை அமைச்சர் ,வடக்கு இந்தியர்கள் ,நிலையம் முன் ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.